संत गाडगे बाबांची पत्रे : एक अनमोल ठेवा


मराठी संत परंपरेत गाडगे बाबांचे व्यक्तिमत्त्व अगदी वेगळे एकमेवाद्वितीय आहे. कर्मयोगी, वैराग्यमूर्ती, साम्यवादी, लोकोत्तर इतरही विशेषणे त्यांच्यासाठी वापरली जातात. परंतु, कोणत्याही विशेषणाने त्यांच्या व्यक्तित्त्वाचे खरे दर्शन होत नाही. विसाव्या शतकातील संत तुकाराम असा त्यांचा उल्लेख केला जातो. मात्र, संत तुकारामांपेक्षा त्यांचे वेगळेपणही खूप आहे. गांधीजींच्या एकादशव्रताचे गांधीजींपेक्षाही अधिक कठोरपणे पालन करणारे ते एकमेव दिसतात. त्यांनी प्राथमिक गरजाही जवळपास नाकारल्याच होत्या. त्यांनी दशसूत्रीद्वारे नवा सुलभ मानवतावादी धर्म प्रतिपादला. श्रम आणि सेवा हीच खरी धर्मसाधना, असा त्यांचा विचार होता. त्यांनी कृतीद्वारे व कीर्तनाद्वारे लोकप्रबोधन करून सत्मार्गाला लावले. जनीजनार्दन हा विचार त्यांनी अधिक प्रभावीपणे मांडला व आचरणात आणला.

शालेय शिक्षण न झालेले, लिहिता वाचता न येणारे गाडगेबाबा प्रज्ञावंत व प्रतिभावंत होते. त्यांची कीर्तने उपलब्ध असती तर तो मोठा वाङमयीन ठेवा ठरला असता. त्यांच्या सुमारे बारा ते पंधरा हजार कीर्तनांपैकी शेवटचे एक अत्यंत आजारी असतानाचे कीर्तन उपलब्ध आहे. त्यांची कीर्तने व पत्रे हे त्यांचे वाङ्मय आहे. सुदैवाने त्यांची काही पत्रे उपलब्ध आहेत. ही त्यातल्या त्यात आनंदाची व महत्त्वाची बाब आहे.

गांधीजींची पत्रे, नेहरुजींचे पत्रे, साने गुरुजींची पत्रे तशी गाडगेबाबांची पत्र महत्त्वाची आहेत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली व सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली. त्याप्रमाणे बाबा पत्र सांगत व इतर कोणी लिहून घेत असे. ज्याला पत्र पाठवायचे त्याचा पत्ता बाबांना पाठ असे, शिवाय पत्त्याची वही त्यांच्या गळ्यात टांगलेली असे. पत्र स्वच्छ, सुंदर, नीटनेटके, परिच्छेदात्मक लागे असे झाले नाही तर फाडून दुसरे लिहावे लागे. बहुतेक पत्रे कामाच्या संदर्भात असत. जास्तीत जास्त पत्रे अच्युतदादा देशमुख यांनी लिहिली आहेत. २ नोव्हेंबर १९५० रोजी यशवंतराव बाबा, यशवंतराव शिंदे व अच्युत देशमुख यांना लिहिलेल्या पत्रात गाडगेबाबा जीवन म्हणजे प्रकाश व मृत्यू म्हणजे अंधार. प्रकाश आहे तोपर्यंत सर्व कामे आटोपून घ्यावी. हे सत्य स्पष्ट करतानाच निष्कामबुद्धी आणि कडक वैराग्याचा विचारही त्यांनी मांडला आहे.१४ डिसेंबर १९५० च्या चित्रा देशमुख यांना पाठवलेल्या पत्रातून जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत ही त्यांची माणसालाच देव मानण्याची वृत्ती स्पष्ट झाली आहे. बाबा आयुष्याचे महान उपासक होते. पशुहत्या बंदीचे मोठे समर्थक होते. एका पत्रात ते लिहितात दत्तजयंती न कराल तरी चालेल, पण आपल्या गावात बकरी-कोंबडी कोठे मारत असेल तर बंद करा, हिंसा एकदम बंद करा नाहीतर आज दत्त जयंती कराल आणि उद्या मरिमायची जत्रा भरवाल.

अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे ते महान प्रवर्तक होते. दगडाच्या देवापुढे नैवेद्य ठेवावा व गरिबांना उपाशी ठेवावे, हे त्यांना मान्य नाही. देवी आल्यानंतर देवीला नवस करू नका, वैद्याकडे जा असा सल्ला ते पत्रातून देतात. दुसऱ्या एका पत्रात कॉलऱ्याचे कारण आज स्वच्छता सांगतात. काळाचा विचार करता त्यांचा हा विचार अत्यंत महत्त्वाचा व विवेकवादी विज्ञाननिष्ठ आहे.

त्यांनी अनेक संस्था व धर्मशाळा उभारल्या. परंतु, ते कुठेच ट्रस्टी झाले नाही. नातेवाइकांना ट्रस्टी केले नाही. ट्रस्टी कसा असायला पाहिजे याबाबत एका पत्रात ते लिहितात. पंच कोणाला म्हणतात? त्या धर्माच्या फंडात काही टाकता आले नाही तरी चालेल, पण त्या फंडातील दोन पैसे घरी लांबवले नाही तर तेच खरे पंच. सदाचारी, सुस्वभावी, परोपकारी वृत्तीचा असला पाहिजे असा त्यांचा विचार होता. त्याचे महत्त्व त्यांच्या अनेक पत्रांमधून व्यक्त होते.

अच्युतराव देशमुख यांना १८ जानेवारी १९५४ रोजी मालेगाववरून लिहिलेल्या पत्रात ते लिहितात,

"सदावर्तात भाकरी व रोट्या एकसारख्या वजनदार करीत जा. देवळात स्वच्छता ठेवा, सभामंडपातील फरशी जास्त माणसे लावून बसून टाका. रामेश्वराच्या देवळाजवळ साफसफाई करा. देवळापुढे रोज सडा टाकत जा."

गुरू-शिष्य परंपरा अनेक पत्रात महत्त्वाची मानली जाते. अभिमानाने सांगितले जाते, परंतु गाडगेबाबा मी कोणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही, याबाबत अतिशय दक्ष असल्याचे त्यांच्या पत्रावरून दिसून येते.अनंतराव गद्रे यांना बाबांनी शिष्य केले, अशा आशयाची बातमी वृत्तपत्रात दिली होती. बाबांनी त्यांना पत्र लिहून त्यांची कानउघाडणी केली व त्यांना वृत्तपत्रातून खुलासा करायला लावला. या पत्रात बाबा म्हणतात...

"आजपर्यंत मी कोणाला आशीर्वाद दिला नाही. आशीर्वाद देणारा एकच परमेश्वर आहे."
बाबांच्या चार अपत्यांपैकी एकटी अलोकाबाईच जगली. ती संत नव्हती. सामान्य स्त्री होती. मूर्तिजापूरच्या गोरक्षणात ती भाडे देऊन राहत होती. पण, बाबा तिला तेथून बाहेर पडायला सांगतात. तिला कोणतीच सवलत घेऊ देत नाही.

२० जुलै १९५५ च्या पत्रात बाबा अत्यंत कठोरपणे त्यांची कानउघाडणी करतात.

"अलोकाबाईस संत गाडगेबाबांचे अनंतकोटी नमस्कार, पत्रास कारण की, गोरक्षणातून लवकर बाहेर पडाल तर फार बरे होईल. तुला पैशाचे पक्के भूत लागले, कच्चे नाही. तू मेल्याशिवाय ते भूत निघणार नाही. दादाला निरोप सांगा की पाहुणेबुवाचे (बाबांचे जावई) दोन रुपये बंद करा, पाहुणे तुझे मालक त्यांच्या डोळ्यांनी दिसत नाही. त्यांची पूर्ण सेवा कर. ज्या माणसाला पैशाचे भूत लागले तो पोटाला कमी खात असतो. तो स्वतः काही खात नाही तर दुसऱ्याला काय घालणार? खोली आम्ही तुझ्या आईच्या हयातीपर्यंत ठेवणार, ती तेथे राहील. तुम्ही आपले कुठेही घर बांधा व भेटीला येत जा. आता गाडगेबाबांची मुलगी म्हणून सांगू नको. तुझ्या पोटी जन्मलेला मुलगा वासुदेवराव तेवढा फक्त सुधारला. अजून पक्का नाही. त्याचे वय किती व तुझे वय किती, तो सुधारला व तुला सुधारायला बुद्धी नाही."

याच पत्रात पुढे एका ठिकाणी बाबा लिहितात...

"काल पाहुणेबुवा न विचारता खोलीतले सामान काढून खोलीत घुसले. धर्मशाळेत मला तांब्या उचलता येत नाही, असे ट्रस्ट आहे. जिथे तुमची कोण किंमत करीन. दादाला सांगा की पाहुणेबुवाला धर्मशाळेत कामाला ठेवू नये व तुम्ही शहाणे असाल तर जाऊ नये."

या दीर्घपत्रात शेवटी बाबा अलोकाबाईला म्हणतात...

"मरता मरता कबिराने मुलाला मार्ग सांगितला."

पत्रावरून बाबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू स्पष्ट होतात. बाबा अष्टावधानी होते. एकाच वेळी ते दोन-तीन लोकांना पत्र सांगत. त्यांनी पत्रे वऱ्हाडी बोलीतून सांगितली. त्यांना प्रमाण मराठी येत नव्हती. लिहिणाऱ्यांनी ती प्रमाण मराठीतून लिहिली. नवीन शैक्षणिक धोरणात बोली हे शिक्षणाचे माध्यम झाले आहे. बोलीचे महत्त्व केंद्र शासनानेही मानलेले आहे. बाबांची पत्रे लेखकांनी वऱ्हाडी बोलीऐवजी मराठीतून लिहिल्यामुळे फार मोठ्या आणि महत्त्वाच्या वऱ्हाडी गद्य वाड्मयाला, पत्र वाङ्मयाला आपण मुकलो आहोत. पत्र लेखकांनी बाबांचा आशय व काही प्रमाणात अभिव्यक्तीची शैली जपली, परंतु वऱ्हाडीचे मराठीत भाषांतर करण्यासाठीचे भाषांतर कौशल्य हवे होते, ते त्यांच्याजवळ नव्हते. त्यामुळे पत्रांची लज्जत कमी झाली.

बाबा कधीच वापरत नसलेले नागरी शब्द पत्रांमध्ये आले. पत्रे वऱ्हाडीत उपलब्ध असती तर ती अधिक सजीव, सकस, सुश्राव्य वास्तव झाली असती. बाबांची बोलीभाषा साधी, सरळ, अलंकृत पण प्रवाही, जोरकस, दमदार निश्चयात्मक आहे. त्यांच्या शब्दांना अनुभवाचे अधिष्ठान आहे. जनसेवेचे, जनकल्याणाचे, जननिष्ठेचे तेज आहे. त्यांची भाषा साधी पण समृद्ध अर्थवाही आहे. बाबांची पत्रे जनकळवळ्यामुळे जनकल्याणासाठी तळमळणाऱ्या हृदयाची स्पंदने आहेत.
- डॉ. सतीश तराळ


0 comments :

Post a Comment

 

Wikipedia

Search results

My Blog List

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Our Mission

गाडगे बाबांचे विज्ञानवादी व शैक्षणिक विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे हे आपले उद्दिष्ट आहे. गाडगे बाबा हे परिवर्तनवादी संत होते आणि त्यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे.

Popular Posts


गाडगे बाबा

गाडगे बाबा म्हणजे अन्याय, अत्याचाराने गांजलेल्या व अंधश्रद्धेत बुडालेल्या शोषित पिडीत समाजाला लोकशिक्षण देणारा लोकशिक्षक होय.

Followers

Contact Form

Name

Email *

Message *

Total Pageviews

Pages

Featured post

संत गाडगेबाबा: द्रष्टा वास्तुनिर्मितीकार

  संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या काळात समाजप्रबोधनाबरोबरच राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया,...

Translate

Books

  • आदिवासी मुलांचे शिक्षण
  • श्री संत गाडगे महाराज - प्रबोधनकार ठाकरे
  • श्री संत गाडगे महाराज
  • लोकशिक्षक गाडगे बाबा

Pages

Followers

External Links