गाडगे बाबांचा पत्रव्यवहार....

गाडगे बाबांनी आपल्या हयातीत अनेक पत्रे लिहिली. अर्थात त्यांना लिहिता वाचता येत नसले, तरी ते इतरांकडून आपणास हवे तसेच पत्र लिहून घेत असत. पत्र लेखनाच्या कामात गुरूदास ढेमरे गुरूजी, अण्णा ठाकरे, अच्युतराव देशमुख, सखाराम सावंत, रामलाल मास्तर, यशवंतराव शिंदे, वासुदेव सोनोने, ब. आ. कळसकर, नगीणदास, किसन पेटीवाला, गुणवंतराव चराटे, तुकाराम रत्नागिरीकर, ओंकार जोशी, जयराम राघोजी वारंग, भुजंगराव आंजनखेडकर, सुखदेवराव घोंगटे, गणपतराव गांगण, नारायण महाराज ढाणकीकर, कृ.भा. घाणेकर आदी सेवकांची मदत घेतली.

बाबांची पत्रे आपल्या डोळ्यात अंजन घालणारी अशीच आहेत. आपली संस्था अथवा सामाजिक काम कसे चालवावे याचा वस्तुपाठ गाडगे बाबांनी आपली पत्नी हिस लिहिलेल्या पत्रातून शिकवलेला आहे.

गाडगेबाबांची पत्नी भीक मागून जगत आहे म्हणून अस्वस्थ होऊन मूर्तीजापूर येथील डॉ.सहस्त्रबुध्दे यांनी कुंताबाईला स्वतःच्या घरी आश्रय दिला. त्यांना भीक मागू दिली नाही. बायकोला आश्रय मिळाला ही गोष्ट गाडगेबाबांच्या कानी गेली. बाबांनी लगेच डॉ. सहस्त्रबुध्दे यांना पाठविण्यासाठी पत्र लिहून घेतले. या पत्रातून त्यांची समाजसेवची कल्पना किती कठोर आणि पारदर्शक होती हे लक्षात येईल, ते पत्र असे होते......

श्रीमंत कर्णासारखे उदार दयाळू  सहस्त्रबुध्दे
डॉक्टर साहेब यांस......
गाडगेबुवांचे अनंत कोटी नमस्कार, आपल्या घरी आपण माझी लक्ष्मी सौ. कुंताबाई यास ठेऊन घेतले आहे, असे समजले. आम्ही परीट, लोकांचे कपडे धुऊन, त्यांचे घरून भाकरी मागून खाव्या, हा आमचा धंदा. त्यास फुकट, काम न करता खाऊ घालू नये. कपडे धुऊन घ्यावे. हे न झाले तर त्यास गाव मोकळे आहे. त्यांनी कुठेही भाकरी मागून खावे. आपल्या घरी राहू नये.

डॉ. सहस्त्रबुध्दे यांना लिहिलेले हे पत्र सामाजिक काम किती कठोर आणि पारदर्शकपणे केले पाहिजे याचा मुलखा वेगळा पुरावा आहे. आजच्या साधू- संतांच्या कल्पनेच्या पलिकडचे आहे.

आलोकाबाई ही गाडगेबाबांची लेक. या लेकीलाही असेच फाटके आयुष्य जगावे लागले. तिकडे बाप मात्र लोकांचे फाटके संसार शिवत होता अन् लेक मात्र आयुष्यभर फाटकीच. ऋणमोचनच्या यात्रेत बाबा वस्त्रदानाचा कार्यक्रम पार पाडीत होते. कार्यक्रम संपला तेव्हा 20 साड्या शिल्लक होत्या. लेक आलोका आपले फाटके लुगडे बापाला दाखवत होती, मात्र बापाने तिला उरलेल्या साड्यांपैकी एकही साडी दिली नाही. शंकर महाराज वंजारी नावाचे बाबांचे एक अनुयायी लाडूचा डबा आलोकाबाईस देतात. बाबांना हे माहीत होते आणि लगेच ते लाडूचा डबा परत करतात. असाच एक प्रसंग आलोकावर कोसळला. बाळंतपणासाठी ती मूर्तीजापूरला आली होती. लेकीचं पहिलं बाळंतपण होतं. पत्नी कुंताबाईने ही बाब बाबांच्या कानावर टाकली. सासरी जाताना लेकीला साडी-चोळी करावी लागेल असे सांगितले. मात्र बाबाचे उत्तर भलतेच आले. "बाप जर एकपट साधू असेल तर मुलांनी दहा पट साधू व्हावे" असे ते उत्तर होते. शेण, गोवऱ्या गोळा कर आणि त्यातून आलेल्या पैशातून चोळी-बांगडी करून घ्या, असा बाबांनी निर्णय दिला. असा हा सामाजिक अंगाने अत्यंत पारदर्शक असलेला माणूस बाप म्हणून भावनिक प्रसंगातही तितकाच कठोर वागायचा. सामाजिक कार्यावरील पारदर्शक निष्ठा व कौटुंबिक भावना यांचे हे व्दंद कसे पेलले असेल बाबांनी? कुठुन आली असेल ही ताकद ? असेच एक पत्र आहे बाबांनी आपली लेक आलोकाबाईस लिहिलेले. 20 जुलै 1955 चे हे पत्र बाबांनी गुरूदास ढेमरे मास्तरांकडून लिहून घेतले आहे.

या पत्रातून गाडगेबाबा नावाचा कठोर बाप समोर येतो. असा बाप की ज्याने सामाजिक क्षेत्रात प्रचंड वैभव निर्माण केले. असा बाप की, ज्याने हजारो दीनदुबळ्यांना आश्रय दिला. हाच बाप लेकीच्या बाबतीत किती कठोर वागला हे या पत्रावरून सिध्द होते.

सौ. अलोकाबाई यांना
गाडगेबाबांचा अनंत कोटी नमस्कार...

पत्रास कारण की, गोरक्षणातून बाहेर पडाल तर फार बरे होईल. कोठे जागा मिळेल तर घेऊन देतो. निवृत्ती गावाकडे मूर्तिजापूरला येतो म्हणतो. त्याचे 500 रुपये आहेत. त्याला दिलेले 250 रुपये व लग्नाला दिलेले 250 रुपये त्याला आता आमचे कडून शिक्षणासाठी व जाण्यायेण्यासाठी पैसे मिळत नाहीत. त्याला आता 500 रुपयातून पैसे पाठवितो. तो तुमचे आज्ञेप्रमाणे राहील तर ठीक नाही तर तो आपले मनाप्रमाणे त्या 500 रुपयाचे काहीही करो. त्याचे 500 रुपये देऊन टाका. पाहुणेबुवाचे 250 रुपये दादांचेकडे देऊन टाका. दादा त्यांना दोन रुपये देतात. ते बंद करा. त्यांचे हयातीपर्यंत 250 रु. त्यांना देतील. अडचण आली तर मी देईन. तुमची मुलगी मास्तरीणबाई तिचे 250 रु. आहेत. 250 रु. तुमचे वावरातील द्या. असे 600 रु. तिला द्या व त्यांना सांगा की, तुम्ही कुठेही घर बांधा पण गोरक्षणात राहू नका. 150 रु. लागवणचे वावर तुम्हाला 100 रुपयात दिले. प्रभाकरचे इकडे 500 रु. राहिले तर 1000 रु. राहिले म्हणत होते. बरे झाले त्यांनी तुमची सही, आंगठे, तारीख मिती लिहून घेतली होती. नाही तर मोठा गोंधळ झाला असता. तुला पैशाचे पक्के भूत लागले. कच्चे नाही. तू मेल्याशिवाय ते भूत निघणार नाही. तुला हे न लागावं पण लागलं. दादाला निरोप सांगा की पाहुणेबुवाचे 2 रु. बंद करा. पाहुणे तुझे मालक आहेत. त्यांचे डोळ्याने दिसत नाही. त्यांची पूर्ण सेवा कर. ज्या माणसाला पैशाचे भूत लागले तो पोटाला कमी खात असतो. तो स्वत: काही खात नाही तर दुसऱ्याला काय घालणार? खोली आम्ही तुझ्या आईचे हयाती पर्यंत ठेवणार. ती तेथे राहील. तुम्ही आपले कुठेही घर बांधा व भेटीला येत जा. आता गाडेबाबांची मुलगी म्हणून सांगू नको. तुझ्या पोटी जन्मलेला मुलगा वासुदेवराव तेवढा फक्त सुधारला. अजून पक्का नाही. त्याचे वय किती व तुझे वय किती. तो सुधारला व तुला सुधरायला बुध्दी नाही. मी तुम्हाला येता येता 30 रु. तिकिटाला दिले. ते माझी चूक झाली. आता तुम्ही मला कधी काही मागू नये व तुम्ही मागितले तर मी देऊ नये. देवाचे भक्तीला लागलो म्हणून पांग फिटला व 250 रु. काय पण अडीच रुपये सुध्दा दिसले नसते व मुलांना शाळासुध्दा दिसली नसती. गावोगावचे जसे मेले तसे त्याच नतिजाने तुमचे झाले असते. भक्तीने तुमचा पांग फिटला. काल पाहुणेबुवाने न विचारता खोलीतले सामान काढून खोलीत घुसले. धर्मशाळेत मला तांब्या उचलता येत नाही असा ट्रस्ट आहे. तेथे तुमची कोण किंमत करील? दादाला सांग की, पाहुणेबुवाला धर्मशाळेत कामाला ठेऊ नये व तुम्ही शहाणे असाल तर जाऊ नये व श्री. दादांनी काही देऊ नये. तुमचेवर गोरक्षणाचे लोकांचे असे प्रेम लागले पाहिजे होते की, त्यांनी म्हटले पाहिजे की, तुम्हाला काय पाहिजे. तुम्ही कोठेही राहा पण तुम्हाला कोणी विचारीत नाही. कुत्र्याला आब आहे. पण तुम्हाला आब नाही. तुम्ही शहाणे असाल तर तेथे राहू नये. गाडगेबाबांचे नावावर दादाला किती मान आहे. कोणी धान्य देतात, कोणी कापड देतात, तर कोणी शेत देतात. पण तुमचे झोपडीवर कोणी दीड पायली ज्वारीही आणून देत नाही. साधूचे घरातील माणसे उदार असतात. तुकारामबोवा उदार, जिजाबाई उदार व मुलेही उदार, तसेच कबीर उदार, कमाल उदार, संत आले कबीराचे घरी, कबीराने बाईला वाण्याचे घरी गहाण ठेविले व संतांना जेवू घातले. मरता मरता कबीराने मुलाला मार्ग सांगितला.

"कबीर कहे कमालकू दो बाता लिख ले।
कर साहब की बंदगी और भूखे कु कुछ दे ॥"

तुमचे झोपडीवर एखादा महारोग्याला किंवा आंधळ्याला पांगळ्याला जेवू घालून जुना पुराणा एखादा कपडा देऊन व आणे दोन आणे देऊन वाटेला लावले काय? असे एक जरी उदाहरण असेल तर मला लिहून कळवावे. तुला पक्के पैशाचे भूत लागले. त्यावर भुजंग होऊन बसली. तीन वेळा झोपडीतील सामान फेकले. मोटार आली होती तेव्हा डाळीचे पोते मागितले होते. मी नाही म्हटले. आजपासून कोणाजवळ निरोप सांगशील तर तुझा अपमान होईल. करिता कोणाला काही मागू नये. या पत्राची कॉपी श्री. दादा व श्री. वासुदेवराव यांचेकडे पाठविली आहे.

गाडगे बाबांनी लिहिलेल्या पत्रांतून त्यांचे कीर्तनातील विचार व आचरणातील विचार हे एकमेकांना समर्पक होते. हाच आचरणभाव आजच्या समाजजीवनात अंगिकारण्याची गरज आहे. इतके प्रचंड राजवैभव बाबांनी उभे केले अन् ते लोकांच्या स्वाधीन केले. या लोकसंपत्तीवर त्यांनी नातेवाईकांचा हक्क अमान्य केला. अगदी सुतळीच्या तोड्यावरही नातेवाईकांना त्यांनी हक्क दिला नाही. या कर्मयोग्याने उभ्या केलेल्या संस्थेत एकाही नातेवाईकास ट्रस्टी म्हणून स्थान दिले नाही. कुण्या नातेवाईकास साधी नोकरीही दिली नाही. वैराग्य या संज्ञेचा खरा अर्थ म्हणजेच संत गाडगे महाराजांचे जीवन होय. वैराग्याचा यापेक्षा दुसरा पुरावा असू तरी शकतो काय?

- Debuji -The Inspiration

संदर्भ : संतोष अरसोड यांच्या पुस्तकातील सोशल मीडियात प्रकाशित लेखातून...


0 comments :

Post a Comment

 

Wikipedia

Search results

My Blog List

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Our Mission

गाडगे बाबांचे विज्ञानवादी व शैक्षणिक विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे हे आपले उद्दिष्ट आहे. गाडगे बाबा हे परिवर्तनवादी संत होते आणि त्यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे.

Popular Posts


गाडगे बाबा

गाडगे बाबा म्हणजे अन्याय, अत्याचाराने गांजलेल्या व अंधश्रद्धेत बुडालेल्या शोषित पिडीत समाजाला लोकशिक्षण देणारा लोकशिक्षक होय.

Followers

Contact Form

Name

Email *

Message *

Total Pageviews

Pages

Featured post

संत गाडगेबाबा: द्रष्टा वास्तुनिर्मितीकार

  संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या काळात समाजप्रबोधनाबरोबरच राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया,...

Translate

Books

  • आदिवासी मुलांचे शिक्षण
  • श्री संत गाडगे महाराज - प्रबोधनकार ठाकरे
  • श्री संत गाडगे महाराज
  • लोकशिक्षक गाडगे बाबा

Pages

Followers

External Links