'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' असे म्हणून गाडगे बाबांच्या कार्यावर पाच दहा मिनिटे भाषण केले व त्यांच्या जयंती - पुण्यतिथीच्या दिवशी बाबांच्या फोटोला हार घातला म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. ज्यांच्या ज्यांच्या जीवनाशी गाडगे बाबा हे नाव जोडलेले आहे, त्यांची आजच्या समाजजीवनात जबाबदारी अधिक वाढलेली आहे. आझादी का अमृतमहोत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असलो, तरी समाजात ज्या प्रकारचे परिवर्तन गाडगे बाबांना अपेक्षित होते, ते झालेले दिसून येत नाही. असे असताना आपण गाडगे बाबा यांचे जीवन व विचार अधिक जबाबदारीने समजून घेणे व कृतीत उतरवणे आवश्यक आहे.
गाडगे बाबांना त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वाहलेली श्रद्धांजली आठवून बघा. काय म्हणाले होते पंडित नेहरू...
"अमरावती जिल्ह्यातील एका धोबी समाजाच्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या गाडगे बाबांनी संपूर्ण महाराष्ट्रात गरीब आणि पीडितांसाठी खूप काम केले. ही परंपरा त्यांच्या शिष्यांनी चालवली पाहिजे. कोणत्याही महापुरुषाला फक्त एखाद्या जाती पातीत अडकवण्याला माझा विरोध आहे. आपला देश महापुरुषांना देव बनवून लहान करतो. या देशात कधीच सामाजिक क्रांती झाली नाही. याचे कारण म्हणजे क्रांतिकारी विचार असलेल्यांना आपण मंदिरात बसवून संपवतो. गाडगे बाबांबाबत असे होऊ नये. गाडगे बाबा चमत्कार करणारे संत नव्हते. ते समाजाचे सेवक आणि समाजाला शिक्षण देणारे शिक्षक होते."
दुर्दैवाने जी भीती पंडित जवाहरलाल नेहरू यांना वाटत होती, तीच परिस्थिती आज समाजात पाहायला मिळत आहे. गाडगे बाबांनी मंदिरात बसवून लोकांनी त्यांना देव बनवून टाकले आहे. गाडगे बाबांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणता येऊ शकतात, परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. गाडगे बाबांचे विचार अमंलात आणणे फार अवघड आहे असे नाही. फक्त कुटुंबाच्या पलीकडे समाजाकडे बघण्याचा मानवतावादी दृष्टिकोन विकसित करण्याची गरज आहे. गाडगे बाबांनी माणसात देव बघायला सांगितले, तोच प्रयत्न आज जर प्रत्येकाने केला, तर नक्कीच बदल होतील ही ताकद बाबांच्या विचारांची आहे.
गाडगे बाबांनी ज्या शिक्षणाचं महत्त्व गावागावात जाऊन लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला, तेच शिक्षण आज समाजात कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे डोळसपणे बघण्याची गरज आहे. गाडगे बाबांच्या विचारांतून सुरू झालेल्या शाळा, आश्रमशाळा कोणत्या संघर्षातून जात आहेत हे स्वीकारून त्यात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. गाडगे बाबा समाजाचे शिक्षक होते आणि शिक्षकाचा तो वारसा पुढे समर्थपणे पेलण्याची जबाबदारी आपली आहे.
असो अडचणी अनेक आहेत. अनेकांशी गाडगे बाबा व त्यांचे कार्य आणि आजचा समाज व आपली जबाबदारी याबाबत बोलायला लागलं की ते दुसऱ्याकडे बोटं दाखवतात. काही जण परिस्थितीला दोष देतात, तर काही जण गाडगे बाब महान होते...आपण थोडेच त्यांच्यासारखे काम करू शकतो असे म्हणून पळवाट काढतात. खरं तर गाडगे बाबांचे कार्य पुढे न्यायचे असेल तर पदोपदी स्वतः गाडगे बाबांचे विचार पथदर्शक आहेत. परंतु त्या विचारांकडे बघण्याचा डोळसपणा मानवतावादी दृष्टिकोनातून कोण दाखविल हा एक प्रश्न आहे.
जो निसर्ग माणसाला श्वास घेण्यासाठी ऑक्सीजन मोफत देतोय, त्याच निसर्गाला माणूस निव्वळ वरवरच्या फायद्यासाठी संपवत चालला आहे. गाडगे बाबांच्या बाबतीत देखील काही माणसं तसंच वागताना दिसतात. आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी बाबांच्या विचारांना पायदळी तुडविण्याचे काम करत आहेत. दुर्दैवाने यावर परखड भाष्य करण्याची हिम्मत दाखवणारे गाडगे बाबा, प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, तुकडोजी महाराज यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व समाजात अस्तित्वात नाहीत. आज समाजात राजकीय अस्थिरता दिसून येत आहे, अंधश्रद्धा, बेरोजगारी, कुपोषण, शिक्षण, व्यवसाय, शेती अशा प्रत्येक क्षेत्रात प्रचंड अडचणी वाढलेल्या आहेत. दुर्दैवाने त्यावर उपाय शोधण्याचे प्रामाणिक प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. जो तो समाजातील दुरवस्थेचे भांडवल करून आपला मोठेपणा मिरवण्याचा प्रयत्न करतोय. बाळासाहेब खेर यांना जसा गाडगे बाबांनी रयत शिक्षण संस्थेची ग्रँट बंद केल्याबाबत जाब विचारला होता, तसा जाब आजच्या परिस्थितीत विचारण्याची हिम्मत करताना कोणीही दिसत नाही आणि म्हणून गाडगे बाबांची उणीव खरंच आज समाजात भासत आहे. शेवटी एवढंच गाऱ्हाणं मांडतो...
हात जोडूनी करतो विनवणी
गाडगे बाबांची ऐका कहाणी
भुकेलेल्याला द्या अन्न
तहानलेल्याला द्या पाणी
||जय गाडगे बाबा ||
- राजू ठोकळ
Debuji -The Inspiration
0 comments :
Post a Comment