श्री संत गाडगे महाराजांचा जन्म पुरोगामी महाराष्ट्रात होणे हा एक विलक्षण भाग्याचा क्षण म्हटला पाहिजे. महाराष्ट्रात इतर साधु संतानी उपदेश केला मात्र संत गाडगे महाराज यांनी आधी स्वतः कृती केली व नंतरच प्रबोधनाचे कार्य केले. म्हणजे संत गाडगे महाराजांनी कृतीला सर्वासर्वे मानले व ते शंभर टक्के कृतीतूनच यशस्वी करून जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जन कल्याणाकरिता स्वतःचे आयुष्य झिजवले.
श्री संत गाडगे महाराज यांना कोणत्याही व्यवसायात रस नव्हता. कारण, व्यवसाय हे कांही त्यांचे जीवन नव्हते. खडतर जीवन हाच त्यांचा व्यवसाय होता. गाडगे महाराजांच्या जीवनात विलक्षण जिज्ञासा होती, म्हणून स्वतःच्या कठोर परिश्रमातून व कृतीतून त्यांनी जीवनातील कठोर सत्य तत्वांचा पाठपुरावा केला. श्री संत गाडगे महाराजांची जीवाची नुसती तडफड व तळमळ पाहिली की, त्यांनी अंतिम सत्यापर्यंत जाण्याचा यशस्वी प्रयत्न केला असे खात्रीपूर्वक म्हणता येईल.
श्री संत गाडगे महाराजांचे जीवन म्हणजे वाहत्या पाण्यासारखे होते. आयुष्य हे पाण्यासारखे सतत वाहत राहीले, तरच ते खरे जीवन. साचून राहिले तर, ते डबके झाल्याशिवाय राहात नाही. जीवन म्हणजे एक प्रचंड मौज आहे. तिचा कितीही आस्वाद घ्या कंटाळा कधी येणार नाही आणि तृप्तीही कधीही होणार नाही. यातच गुरफटून राहणे व सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजे श्री संत गाडगे महाराज होय.
श्री संत गाडगे महाराजांना जीवनाचा लोभ नव्हता पण ओढ होती. त्या ओढीपोटी त्यांनी त्यांचे स्वतःचे संपूर्ण जीवन पायात चक्र बसवून सातत्याने गावोगाव फिरत राहिले. या जगात प्रत्येक माणूस आपल्या स्वत: करिता जगतो हे सर्वश्रूत आहे. परंतू श्री संत गाडगे महाराज मात्र संपूर्ण जीवन जगले ते केवळ इतरांसाठी, जनहितासाठी, लोक कल्याणासाठी. वृक्षवेलीची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात, तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात तसे याच पद्धतीप्रमाणे गाडगे महाराजांनी संपूर्ण आयुष्यभर गावोगाव फिरत हाती खराटा घेऊन सफाई करीत व आपल्या कीर्तनाच्या माध्यमाद्वारे अमृतवाणीने लोकांच्या अज्ञानावर अंधश्रद्धेवर प्रहार करीत व लोकांचे प्रबोधन कसे होईल याकडे सातत्याने लक्ष पुरविले. पारंपारिक चालीरिती, देवभोळेपणा, यातूनच देवाकरिता प्राण्यांचा बळी देणे या वाईट प्रथेवर त्यांनी प्रहार केले.
गाडगे बाबांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. जितके त्यांच्या जीवनात आपण खोलवर जाण्याचा प्रयत्न करू, तितका अधिकचा गोडवा आपणास त्यांच्या जीवनातून समजून येतो. त्यांचं जीवन म्हणजे एक तपश्चर्या होती. त्याचं फळ आजचा महाराष्ट्र चाखत आहे. अनेकांच्या संसारांना, कुटुंबांना बाबांच्या विचारांनी तारले आहे ही बाब आपल्यासाठी नेहमीच भूषणावह आहे.
Debuji -The Inspiration
0 comments :
Post a Comment