अवघ्या वयाच्या आठव्या वर्षी श्री संत गाडगे बाबांनी जातीयवादाविरूद्ध रान पेटविल ही गोष्ट आपल्याला सहजासहजी पचनी पडेल अशी नाही. या ठिकाणी एक बाब गांभीर्यपूर्वक आपण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महात्म्यांनी जातीयवादावर जेव्हा हल्ला चढवला, तेव्हा ते पूर्णतः परिपक्व झालेले होते. शिक्षणाचं पाठबळ त्यांच्याकडे होते. वयाची अनेक वर्षे घालविल्यानंतर त्यांनी हा सामाजिक परिवर्तनाचा मुद्दा मांडून हा फार मोठा वैचारिक क्रांतीचा पाया रोवला होता. परंतु गाडगे बाबांच्या बाबतीत असे काही नव्हते. शिक्षणाचा संबंध नसल्याने ज्ञान आत्मसात करण्याचे मार्ग मर्यादित होते. लहानपणापासून ऐकत आलेले अभंग हा एकमेव मार्ग त्यांच्याकडे होता. असं असताना सामाजिक उत्थानाची मुहूर्तमेढ गाडगे बाबांनी अगदी कमी वयात रोवली हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. एक आठ वर्षाचा मुलगा पटदिशी रानात आपल्या सवंगडयांना घेऊन सहभोजनाचा कार्यक्रम करतो आणि हजारो वर्षांपासून चालत आलेल्या जातीयतेचं विष काढून टाकण्याचा नुसता प्रयत्न नाही, तर प्रत्यक्ष कृती करतो. म्हणून या ठिकाणी नरहर कुरूंदकरांची प्रकर्षाने आठवण होते. कारण कुरूंदकर नेहमी म्हणत, योगी पुरुष उदाहरणार्थ श्री. छत्रपती शिवाजी महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज हे आठव्या वर्षी कसे वागले असतील ? आणि छत्रपतींनी आठव्या वर्षीच एका मुसलमान सुलतानाची मती गुंग केली होती आणि त्या सुलतानाने भर दरबारात हा छोकरा करामत केल्याशिवाय राहणार नाही असे केलेले भाकीत पुढील काळात शंभर टक्के सिद्ध करून दाखविले. श्री संत ज्ञानेश्वरांबाबतही असाच अंदाज बांधता येईल. योगी पुरूष, कर्मयोगी हे लहानपणापासूनच त्यांच्या कार्यास सिद्ध होत असतात. अशी अनेक उदाहरणे जगातही पहावयास मिळतात. त्यातील नेपोलियन बोनापार्ट, जॉन किटस् यांचाही वैचारिक वारसा सामाजिक परिवर्तनाची लढाई लढणाऱ्यांनी समजून घेतला पाहिजे. येथे एका बाबतीत जॉन किटस् व ज्ञानेश्वरांबाबत वयाच्या बाबतीत साधर्म्य दिसून येते. ज्ञानेश्वरांनी आपलं कार्य संपवून या जगाचा निरोप घेतला, त्यावेळी त्यांचे वय अवघे बावीस वर्षांचे होते. तसं पाहिल्यास ज्ञानेश्वराचं मोठेपण हे मराठी भाषिकांपुरतंच सिमीत होतं. आज माहिती तंत्रज्ञानामुळे या कक्षा रुंदावल्या आहेत. परंतू जॉन किटस् यांचे मोठेपण हे सिमीत नसुन त्यांचे मोठेपण "विश्वाला गवसणी" घालणारे आहे. त्यांनीही या जगाचा निरोप अवघ्या तेवीसाव्या वर्षीच घेतला आहे. श्री. म. माटे हे आपल्या 'देशोदेशीचे ज्ञानेश्वर' या लेखात म्हणतात त्याप्रमाणे 'कालमानाप्रमाणे प्रत्येक देशात विद्वान माणसे जन्माला येतात' हे विधान खरे वाटते. श्री. संत गाडगेबाबा यांनी आपल्या कृतीने, लेकराचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे अवघ्या आठव्या वर्षी विषमतेची कोंडी फोडून समतेची दारे ठोठावली आणि यातूनच वैचारिक क्रांतीचा जन्म या देशात झाला. याला खरेखुरे प्रबोधन म्हणता येईल. हे प्रबोधन कायद्याने करता येत नाही. आज भारतामध्ये अनेक वाईट प्रथा चालूच आहेत. कायदा हा धाब्यावर बसवून मोठमोठी माणसे पळवाटा शोधून काढतात आणि आजही ऐनकेन प्रकारे सतीची चाल, हुंडयाची चाल, काही अंशी बालविवाह हे ही सर्रास होत आहेत. कायदे करूनही सामाजिक पातळीवर बदल झालेले नाहीत. म्हणून कायद्यापेक्षा लोकांच्या डोक्यातील अडाणीपण जाणं या करीता जी मेहनत लागते ती मेहनत श्री संत गाडगे बाबांनी आचरणात आणून एक प्रकारे कायद्यापेक्षाही पुढे एक पाऊल ठेऊन या देशातील सामान्य माणसाचे खरेखुरे प्रबोधन केले.
कीर्तनात बाबांचा स्वर कधी उंच, कधी मऊ करूणाजनक तर कधी कठोर. कधी शब्दांचे आसूड ओढीत तर कधी शब्दातून लोकांना पोटाशी धरत. आईच्या मायेने लोकांच्या पाठीवरून हात फिरवित व म्हणत की,
'प्रपंच करताना छप्पन गोष्टी ध्यानात ठेवता....देवाला विसरता....ज्याची नोकरी करता त्याला सलाम करता...त्याच्या पोराला खेळविता...त्याची भाजी आणता...त्याची कुत्रे फिरवून आणता...त्याच्या बायकोने सांगितलेले काम करता. संत म्हणतात,
जो अन्न देतो उदरासी ।
शरीर विकावे लागे त्यासी ॥
मा जेणे घातिले जन्मासी ।
त्यासी कैसे विसरावे ॥
ज्याने आपणास जन्म दिला, त्याचा चांगल्यासाठी उपयोग करावा. डोळे दिलेत तर चांगले पहावे, जीभ दिली तर देवाचे नाव घ्यावे संत सांगतात. या अशा सहज सोप्या भाषेत देव माणसात आहे हे जगाला पटवून देण्याचे काम गाडगे बाबांनी आयुष्यभर केले.
गाडगे बाबांचे विचार सहज सोपे वाटत असले, तरी व्यवस्थेत काम करणाऱ्या जबाबदार घटकांच्या पचनी पडायला ते अवघड आहेत. तळागाळातील माणसाला उभारी देणारे त्यांचे विचार व्यवस्थेचे वाभाडे काढत असल्याने स्वतःला उच्च समजून मी पणा मिरविणाऱ्या लोकांना ते अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. वर्चस्ववादाच्या आजच्या लढाईत लोकांना माणूस हवाय सोबतीला पण स्वतः मात्र माणूस बनण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यांचं मन त्यांना तसं करू देत नाही. म्हणून गाडगे बाबा या अशा लोकांनी मंदिरात नेऊन बसवलाय....काहींनी फोटोत अडकून ठेवलाय. आजचा समाज तर त्याहून अधिक कर्मठ बनलेला असून थोर पुरुष ज्या जातीत जन्माला आले होते, त्याच जातीच्या लोकांना त्यांना डोक्यावर घ्यायचे असाच प्रकार सुरू आहे.
असो गाडगे बाबांनी अस्पृश्यतेची लढाई अगदी कोवळ्या वयात सुरू केली हा सिध्दांत जरी आपण समजून घेतला, तरी आपल्याही जीवनात परिवर्तनाची चक्र फिरल्याशिवाय राहणार नाहीत हे मात्र नक्की.

0 comments :
Post a Comment