संत गाडगे बाबांनी समाजाला ज्ञानामृत पाजण्यात आपले आयुष्य अविश्रांत झिजवीले. बाबांनी समाज प्रबोधन केले ते जीवनातील सर्व क्षेत्रात. सर्व स्तरातून जेथे जेथे विषमता आहे, जातीयता आहे, भेदभाव आहे, उच्च निचता आहे, अविवेक आहे, अज्ञान आहे, परस्पर बंधुभावाचा अभाव आहे अशा सर्व उणिवावर बाबांनी अचूक मर्म ठेवून त्या उणीवा दूर व कमी कशा होतील यासाठी डोळस दृष्टीने बाबांनी आपले उभे आयुष्य पणाला लावले.
बाबांनी सामान्य माणसाच्या जीवनात प्रकाश यावा त्यांचे जीवन सुखी व्हावे व त्यांचे वैयक्तीक तथा सामुदायिक जीवन चांगले व सुखकर व्हावे यासाठी आवश्यक असणारी जीवनमुल्ये समाजात रूजविण्याचा किर्तनाद्वारे व कृतीद्वारे प्रबोधनाचा पाया घातला. बाबांनी सामाजिक समतेसाठी झगडा केला.. मानवतेच्या कल्याणासाठी व विकासासाठी जुनाट पुरातन मार्ग सोडून नवीन वाटेने जाण्याची डोळसदृष्टी गाडगेबाबांनी दिली. महाराष्ट्रातील व्यतित झालेल्या रूढीवर, स्वार्थावर, विषमतेवर, ढोंगावर, दंभावर, अज्ञानावर व माणुसकी शुन्य वर्तनावर बाबांनी अत्यंत कडक शब्दात वज्राघात करून स्वतः ला जे जे पटले ते ते आचरणात आणून समाजाला तत्वज्ञानाचा खरा अर्थ सांगून सर्वसामान्य जनतेच्या जीवनात उषःकाल कसा येईल याचे चिंतन करून प्रबोधन अत्यंत प्रभावीपणे त्यांच्या रसाळ अमृतवाणीने ६५ वर्षे परकीय लोकांच्या पैशाला हात न लावता अनेक धर्मशाळा, शाळा, नदीवरील घाट, रस्ते, वृद्धाश्रम, कन्याशाळा, बालकश्रम, गोरक्षण असे अनेक प्रकल्प उभे करून स्वतःचा प्रबोधनाचा कायमचा ठसा देशाच्या प्रत्येक माणसाच्या जीवनात उमटविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. विशेष म्हणजे तो काळ पारतंत्र्याच्या होता. लोकांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. आजच्या सारखे सी एस आर फंड सामाजिक कार्यास उपलब्ध होत नव्हते. असे असतानाही बाबांनी भरीव असे काम केले. त्यांना या कामात यश आले, कारण त्यांचा दृष्टिकोन सामाजिक होता. त्यामुळे समाजाने त्यांना यथाशक्ती मदत केली.
माणसांच्या मनात पिढ्यानपिढ्या वाढत असलेले पारंपारिक अनिष्ट संस्काराची रोपटी बाबांनी अक्षरश: उपटून त्यांना दूर फेकून देवून त्याजागी मानवता व माणुसकीचे अमर असे अत्यंत सुगंधी झाडे लावली.
बाबांनी लावलेल्या सेवारुपी झाडाची फळं आपण आज चाखत आहोत. त्या फळांच्या बिया समाजात रुजविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.
Debuji -The Inspiration
0 comments :
Post a Comment