आठवणीतले गाडगे बाबा....
आषाढी एकादशीला पंढरपूरला प्रचंड गर्दी होते. याच गर्दीत एकदा आषाढी यात्रेच्या वेळी गटार तुंबून पाणी रस्त्यावर आलं होतं. रस्त्याने हजारो भाविक ये जा करत होते. रस्त्यावर पाणी आल्याने अनेकांना चालताना मनस्ताप सहन करावा लागत होता. पाणी रस्त्यावर आल्याबद्दल प्रशासनाला लाखोली वाहून देखील झाली होती. परंतु प्रत्यक्षात पाणी रस्त्यावर का आलंय हे प्रत्यक्षात पाहायला कोणीही पुढाकार घेत नव्हते. कारण प्रत्येकाला दर्शनाला जाण्याची घाई होती. याच गर्दीत गाडगे बाबा येत होते. त्यांना रस्त्यावर आलेले पाणी दिसले. क्षणाचाही विलंब न करता बाबा गटारातील घाण काढून गटार साफ करू लागले. कंबरे एवढ्या पाण्यात उभे राहून घाण उपसायचं काम चालू असताना अनेक वारकरी गर्दी करून बघत होते. याच गर्दीत जवळून पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या संत तुकडोजी महाराजांनी बाबांना पाहिलं होतं. तुकडोजी महाराजांनी चंद्रभागेत स्नान केले. बाहेरूनच पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि ते तडक बाबांच्याकडे आले.
बाप्पा, दर्शन झालं विठ्ठलाचं ?
बाबांच्या प्रश्नाने तुकडोजी भानावर आले.
लवकर दर्शन झालं ?
गाडगे बाबांनी पुन्हा विचारले.
त्यावर काही तरी उत्तर देणे आता तुकडोजी महाराज यांना आवश्यक होते.
आज खरं दर्शन झालं बाबा. कंबरेएवढ्या पाण्यात उभं राहून पांडुरंग घाण उपसत होता.
बाबांना नमस्कार करून तुकडोजी कृतकृत्य झाले. पुढे तुकडोजी महाराज कधीच देवळात गेले नाहीत. बाबांचा आदर्श डोळ्यापूढे ठेऊन दरिद्री नारायणाची सेवा करू लागले.
माणसातला देव जपण्याचे कार्य त्यांनी उर्वरित आयुष्यात केले.
तात्पर्य :
लोकांचं मत व मन बदलविण्यासाठी आपली कृती किती महत्त्वाची असते हे गाडगे बाबांच्या या कृतीतून दिसून येते.
आपण मोठ मोठी भाषणं देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामूळे जी लोकं जवळ असतात, ती पण दुरावतात.
- राजू ठोकळ

0 comments :
Post a Comment