श्री क्षेत्र पंढरपूरचा महिमा मराठी मातीच्या मनाला सांगावा लागणं अजून तरी गरजेचं नाही. पंढरपूरच्या वारीचे संस्कार इथल्या मातीत घट्ट रुजलेले आहेत. आषाढी कार्तिकीस हजारो भक्तांचा थवा मिळेल त्या साधनाने, काही नाही मिळालं तर पायी पंढरीचे नामस्मरण करत चालू लागत. लहानशा पंढरपूरमध्ये यात्रेच्या काळात सुमारे दोन - तीन लाख भक्तांची मांदियाळी होत असे. अतिशय मोठ्या संख्येने येणाऱ्या या भक्तांमध्ये गाडगे बाबा नित्य नियमाने पंढरपुरला जात असत. पंढरपुरला विविध जाती धर्माचे लोक येत असत. त्यात अस्पृश्य लोकांची संख्या देखील कमी नव्हती. इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भक्तांची उतरण्याची सोय होणे तसे कठीणच. यात अस्पृश्यांची विवंचना अतिशय वाईट होती. गाडगे बाबांच्या नजरेतून हे सुटले नाही. यात्रेच्या काळात कपडे वाळत घालायला देखील जागा मिळायची नाही. सर्वत्र मैल्याची दुर्गंधी, डास आणि धेकणांचे साम्राज्य असे. याचा त्रास सर्वांनाच होत असे. सवर्णांना कमीत कमी आपली बोचकी ठेवायला बडव्यांच्या घरांचा किंवा मठाचा आसरा मिळत असे. परंतु अस्पृश्यांचे हाल कुत्र्यानेही खाऊ नयेत असे असत. अनंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत असूनही निष्ठावंत वारकरी दर वारीस यायचे आणि डोळे मिटून या दुर्गंधीतच उतरायचे. त्यांना त्या काळात मंदिरात प्रवेश नसायचा. त्यामुळे कळसाचे दर्शन घेऊनच समाधान मानावे लागत असे.
तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस |
तात्काळ हा नाश अहंकाराचा ||
पावसात भिजत नगरप्रदक्षिणा करताना जे कष्ट पडत, त्यांना काही सीमा नव्हती. त्यांच्या हाल अपेष्टांना मर्यादा नव्हत्या. परंतु अस्पृश्य समाजातील विठ्ठल भक्तांत सहनशक्ती व धैर्य अमर्यादित होते.
गाडगे बाबांनी आपल्या हयातीत हेच दुःख भोगलेले असल्याने अस्पृश्यांच्या यातना त्यांना अधिक जवळच्या वाटू लागल्या होत्या. त्यांचा हा कण्हत कण्हत अनेक पिढ्यांचा प्रवास कुठे तरी थांबला पाहिजे व त्यांना हक्काचा आसरा मिळाला पाहिजे हा विचार गाडगे बाबांच्या मनात डोकावला. बाबांनी आपल्या मनातील ही सल अनेकांना ऐकवली. लोकांना बाबांचे विचार पटत व बाबांवर विश्वास असल्याने जागा, चुना, दगड, वाळू, पाणी, लाकूड, दारे, खिडक्या अशा विविध प्रकारच्या मदतीसाठी लोकांनी होकार दर्शवला.
बाबांनी हातात फुटी कवडी नसताना अस्पृश्यांसाठी पंढरपुरला धर्मशाळा बांधण्याचा निर्णय घेतला. पंढरपूरच्या गोपाळपूर रस्त्यावरील मोकळी जागा खरेदी करून तिथे यवतमाळ जिल्ह्यातील दांभे गावचे जागोबा बोरकर, नागपूर जिल्ह्यातील अड्याळचे तुळशीराम फुलझेले यांची देखरेखीसाठी नेमणूक करून कामाला सुरुवात केली. धर्मशाळेचे बांधकाम सुरू झाल्याची खबर कळताच ठिकठिकाणच्या लोकांकडून पैशाची मदत मिळायला सुरुवात झाली. मदत मिळू लागताच, त्याचा चोख हिशोब ठेवण्याच्या कामात बाबांना व्यवस्थापकाची गरज भासू लागली. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील गणपत हरिभाऊ गांगण याची व्यवस्थापक म्हणून निवड केली. निवडीपूर्वी बाबांनी त्याची अतिशय कठीण परीक्षा घेतली होती.
गणपतराव झोपडीत राहून धर्मशाळेसाठी येणाऱ्या निधीचा चोख हिशोब ठेवीत व देणी चुकवीत असत. चोखामेळा धर्मशाळेचे काम वेगाने सुरू असताना समाजातील विविध स्तरातील लोकांकडून निधी येत होता. त्याच सुमारास गुजरात येथील प्रसिद्ध स्वामी अखंडानंद पंढरपुरला आले होते. अस्पृश्यांसाठी धर्मशाळा बांधण्याचे काम सुरू असल्याची बातमी त्यांना कळताच त्यांनी लागलीच सदर ठिकाणाला भेट देण्याचे ठरविले. बांधकामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन त्यांनी बांधकाम कोण करत आहे याची चौकशी केली. कामगारांनी त्यांना गाडगे बाबांचे नाव सांगितले. कुतूहलापोटी ते गाडगे बाबांना जाऊन भेटले. त्यावेळी गाडगे बाबा एका बाभळीच्या झाडाखाली हातात मिरची भाकर घेऊन खात होते. हे दृश्य स्वामी अखंडानंद यांना सुखद धक्का देऊन गेले.
गाडगे बाबांनी धर्मशाळा बांधण्याची गरज स्वामींनी इतक्या विनम्रपणे सांगितली की स्वामी अवाक होऊन बाबांच्या विचारात मंत्रमुग्ध होऊन गेले. गाडगे बाबांचे विचार व धर्मशाळेची निकड स्वामींच्या लक्षात येताच, त्यांनी आपली मदतीची ईच्छा व्यक्त केली. गाडगे बाबांना वाटले की भगव्या वस्त्रांत आलेला हा स्वामी शे - दोनशे रुपये मदत देईल. परंतु स्वामी अखंडानंद यांनी पंचवीस हजार रुपयांचा चेक दिला.
ज्या काळात सोन्याचा भाव पंचवीस रुपये तोळा होता, त्या काळात गाडगे बाबांना पंचवीस हजार रुपयांची देणगी मिळणं हे बाबांच्या विचारांचं, निष्कलंक कार्याचं, समाजाप्रती केलेल्या त्यागाचं फलित होतं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांचा स्नेह होता व दोघांना एकमेकांबद्दल आदर होता. गाडगे बाबा आपल्या कीर्तनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा व त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करीत असत. ही धर्मशाळा गाडगेबाबांनी 14 जुलै 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली. त्याप्रसंगी या धर्मशाळेचे विश्वस्त भाऊराव गायकवाड, रयत शिक्षण संस्थेचे (सातारा) संस्थापक कर्मवीर भावराव पायगोंडा पाटील, संत गाडगेबाबा, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रावसाहेब जगताप हे उपस्थित होते.
गाडगे बाबांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग हा एक स्वतंत्र अध्याय असून तो आपणास माणूस म्हणून जगायला प्रेरित करतो. आपण ती प्रेरणा आपल्या जीवनात अंगिकारण्याची गरज आहे.
- राजू ठोकळ
Debuji - The Inspiration
संदर्भ: श्रीगाडगेमहाराज, लेखक : गो. नी. दांडेकर
प्रकाशन वर्ष : 1976 ( पहिली आवृत्ती )
0 comments :
Post a Comment