थोर व्यावसायिक जमनालाल बजाज यांच्या कार्यात गाडगे बाबांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसून येते...
जमनालाल बजाज यांनी वयाच्या १७ व्या वर्षी वर्ध्यातील त्यांच्या दत्तक पालकांचा कौटुंबिक व्यवसाय हाती घेतला आणि अनेक कारखाने आणि कंपन्या स्थापन केल्या, ज्यांना पुढे 'बजाज ग्रुप' म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी आपल्या व्यवसायाबरोबरच देशातील पशुधनाचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच सोबतच मुलांची वैद्यकीय, शिक्षण आदींचीही व्यवस्था करत. तो त्या लोकांच्या मुलांना सर्व सोयी- सुविधा पुरवायचा आणि त्यांच्या लग्नाचा संपूर्ण खर्चही करायचा. त्यामुळे गांधीजी जमनालाल बजाज यांना प्रेमाने 'शादी काका' म्हणत.
हरिजनांच्या उन्नतीसाठी त्यांनी काम केले. बजाज हे देशातील पहिले नेते होते, ज्यांनी 1928 मध्ये त्यांच्या पूर्वजांच्या वर्धा येथील लक्ष्मीनारायण मंदिराचे दरवाजे अस्पृश्य आणि दलितांसाठी खुले केले आणि त्यांना प्रवेश दिला. सीकरमध्ये हरिजन विद्यालय उघडले आणि हरिजन सेवक ठेवून आदर्श निर्माण केला.
बाळ गंगाधर टिळक यांच्या निधनानंतर १९२१ मध्ये त्यांच्या नावाने ‘अखिल भारतीय टिळक स्मारक निधी’ स्थापन करण्यात आला. जमनालाल बजाज यांनी त्यावेळी एक कोटी रुपयांचे मोठा निधी दान केला होता. ही रक्कम खादीची देशात लोकप्रियता वाढवण्यासाठी वापरली जात होती. त्यांनी सुमारे २५ लाख रुपये दानमध्ये दिले.
खादीचे उत्पादन आणि विक्री वाढवण्यासाठी देशातील अनेक भागांना भेटी दिल्या, जेणेकरून बेरोजगारांनाही त्याचा लाभ मिळू शकेल. त्यांनी बळवंत सावळेराम देशपांडे यांच्यासमवेत १९२७ मध्ये अमरसर (जयपूर) येथे 'चरखा संघाची' स्थापना केली.
1935 मध्ये बजाज यांनी 'ऑल इंडिया व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशन' ची स्थापना केली आणि संघटनेला त्यांची आवडती मोठी बाग दिली, ज्याला गांधीजींनी 'मगनवाडी' असे नाव दिले. त्यांनी देशाच्या पश्चिम आणि पूर्व प्रांतात हिंदीच्या प्रचारासाठी वर्ध्यात 'राष्ट्रभाषा प्रचार समिती' स्थापन करून त्यासाठी निधी गोळा केला. ‘हिंदी साहित्य संमेलन’ मद्रासच्या अध्यक्षपदीही त्यांची निवड झाली, तेव्हा त्यांनी हे पद भूषवताना राष्ट्रभाषा चळवळ घडवली.
1933 मध्ये त्यांची काँग्रेस कार्यकारिणीवर निवड झाली. सी राजगोपालचारी यांच्यासोबत त्यांनी देशभरात हिंदी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी 'दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा' स्थापन केली.
1927 मध्ये ते जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्लीच्या व्यवस्थापन समितीचे पहिले कोषाध्यक्ष होते. खजिनदार म्हणून कार्यरत असताना 1928 मध्ये ते विद्यापीठाचे आजीवन सदस्य झाले.
1920 मध्ये काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात त्यांना स्वागत समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आणि येथून ते गांधीजींचे पाचवे पुत्र म्हणून ओळखले जाऊ लागले.
असहकार आंदोलनादरम्यान जमनालाल बजाज यांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध निषेधात्मक भाषण दिले आणि सत्याग्रहींचे नेतृत्व केले. या कारणास्तव 18 जून 1921 रोजी त्यांना आणि विनोबा भावेंना अटक करण्यात आली होती. विनोबांना फक्त एक महिन्याची शिक्षा झाली, पण जमनालाल बजाज यांना दीड वर्ष सश्रम कारावास भोगावा लागला आणि रु.3000 रुपये दंड भरावा लागला होता.
जमनालाल बजाज यांच्या प्रयत्नांमुळे 1931 मध्ये जयपूरमध्ये 'जयपूर प्रजा मंडळ'ची स्थापना झाली. 1936 मध्ये हे मंडळ सक्रियपणे काम करू लागले.
जमनालाल बजाज हे संस्थानातील प्रजेचे रक्षण करणारे होते आणि त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपले कर्तव्य पार पाडले.
जमनालाल बजाज यांचा अध्यात्माकडे कल होता, मग त्यांनी खऱ्या कर्मयोगी गुरुचा शोध सुरू केला. कर्मयोगी गुरूच्या शोधात त्यांची पहिली भेट 'मदन मोहन मालवीय' यांच्याशी झाली. त्यांनी रवींद्रनाथ टागोरांसोबतही काही काळ घालवला. त्यांना अनेक गुरू आणि साधू भेटले पण त्यांना त्यांचे खरे आणि शांती देणारे गुरू सापडले नाहीत.
गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह केला तेव्हा त्यांची चर्चा ऐकून बजाज प्रभावित झाले. 1915 मध्ये गांधीजी भारतात परतले आणि त्यांनी साबरमती आश्रम स्थापन केला आणि तिथे राहू लागले. त्यावेळी बजाज यांनीही गांधींसोबत काही काळ राहून गांधींचे व्यक्तिमत्त्व आणि कार्यपद्धती समजून घेतली. जमनालाल यांनी गांधीजींना आपले गुरू केले आणि आपले सर्वस्व त्यांना समर्पित केले.
अशा या महान व्यक्तिमत्त्वाच्या दैनंदिन डायरीमध्ये गाडगे महाराज यांच्या स्मृतींची नोंद सापडते हे विशेष.
दिनांक 20/01/1937 ची दैनंदिन डायरीतील नोंद करताना जमनालाल बजाज हे लिहितात की, भुलाभाई, बाळासाहेब खेर यांच्या बरोबर चर्चा करून संमेलन गाडगे महाराज धर्मशाळा, नाशिक येथे घेण्याचा निर्णय घेतला. या नोंदीवरून आपल्या लक्षात येते की गाडगे बाबांच्या सामाजिक विचारांची माहिती जमनालाल बजाज यांना होती. त्यांचा विश्वास बाबांच्या कार्यावर होता आणि म्हणून संमेलन गाडगे बाबांच्या धर्मशाळेत घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आळा होता.
दिनांक 16/02/1937 रोजी जमनालाल बजाज हे वर्धा येथे असताना त्यांनी गाडगे बाबांच्या प्रयत्नातून केले जाणारे अन्नदान प्रत्यक्ष बघितले. अन्नदान सुरू असताना अचानक आलेल्या पावसाने लोकांना झालेला मनस्ताप पाहून ते हळहळले असल्याची नोंदही ते डायरीत करतात हे फार विशेष आहे. त्यानंतर त्यांनी सुमारे पाऊण तास गाडगे बाबांचे कीर्तन ऐकले. बाबांचे त्या दिवशीचे कीर्तन रात्री दीड वाजता संपल्याची नोंद त्यांनी केलेली आहे. रात्रीचे कीर्तन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा गाडगे बाबांची त्यांनी भेट घेतली व बाबांबरोबर विविध विषयांवर चर्चा केली. तत्कालीन भारतातील एक नावाजलेला व्यावसायिक व सामाजिक, तथा राजकीय क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर काम करणारा व्यक्ती गाडगे बाबांसोबत इतका वेळ देऊन चर्चा करतो हा बाबांच्या विचारांचा विजय आहे.
दिनांक 3/03/1937 च्या डायरीतील नोंदीत गाडगे महाराज व नाशिकच्या मराठा धर्मशाळेसंदर्भात ठराव केल्याचा उल्लेख आढळतो. तसेच दिनांक 5/03/1937 रोजी जमनालाल बजाज हे जळगावहून मुंबईला जात असताना गाडगे बाबांच्या भेटीसाठी ते मराठा धर्मशाळा, नाशिक येथे काही वेळ येतात. या भेटी दरम्यान महानंद स्वामीदेखील उपस्थित होते. गाडगे बाबांसोबत चर्चा केल्यानंतर ते मुंबईला रवाना होतात.
दिनांक 6/02/1938 रोजी वर्धा येथे असताना जमनालाल बजाज यांनी मौलाना आझाद, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, कृपलानी यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री श्रीकृष्ण सेट यांच्याबरोबर फोनवरून बोलणे केले. त्यानंतर सेगाव ( आत्ताचे सेवाग्राम ) येथे जाऊन गांधीजींची भेट घेतली व चर्चा केली. दिवसभरात जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत विविध ठिकाणी उद्घाटन व इतर कार्यक्रमांत ते सहभागी झाले होते. एकंदरीत दिवस हा फार व्यस्त होता. असे असतानाही त्यांनी रात्री वर्धा येथे गाडगे बाबांचे कीर्तन आवर्जून ऐकले.
जमनालाल बजाज यांच्या डायरीतील वरील नोंदींचा विचार करता गाडगे बाबांच्या विचारांचा प्रभाव नक्कीच त्यांच्यावर दिसून येतो. त्यांनी अस्पृश्य व वंचित घटकांसाठी जे काही कार्य केले त्यात गाडगे बाबांच्या विचारांचे प्रतिबिंब आपणास दिसून येते. इतका मोठा व्यावसायिक व्यक्ती असूनही त्यांनी सतत साधेपणाने राहणे पसंद केले. ही जीवनशैली नक्कीच त्यांनी गाडगे बाबांकडून आत्मसात केलेली असावी हे नक्की.
- राजू ठोकळ
संदर्भ जमनालाल बजाज की डायरी, भूमिका - लेखक : काकासाहेब कालेलकर, संपादक : रामकृष्ण बजाज, प्रकाशक : सस्ता साहित्य मंडळ प्रकाशन
0 comments :
Post a Comment