सन 1916 मध्ये मदन मोहन मालवीय यांनी देशभरातून भीक मागून आणि एक एक पैसा जोडून काशी हिंदू विद्यापीठासारखी उच्च दर्जाची राष्ट्रीय शैक्षणिक संस्था स्थापन केली होती हे विशेष. हैदराबादच्या निजामासारख्या कंजूष व्यक्तीकडून ते लाखो रुपये देणगी म्हणून गोळा करू शकले. असे म्हणतात की, जेव्हा मालवीयजी हैदराबादच्या निजामाकडे निधी मागण्यासाठी हैदराबादला गेले आणि त्यांनी काशी हिंदू विद्यापीठाच्या बांधकामासाठी देणगी देण्याची विनंती केली तेव्हा निजामाला राग आला आणि त्याने आपला एक जोडा उचलून मालवीयजींच्या दिशेने फेकला. निजामाने फेकलेला जोडा पंडित मालवीयजींनी निजाम साहेबांनी दान केलेला जोडा म्हणून आदरपूर्वक स्वीकारला आणि निजामसाहेबांचे आभार मानून परत आले. परत आल्यावर मालवीयजींनी वर्तमानपत्रात जाहिरात दिली की निजाम साहेबांनी काशी हिंदू विद्यापीठाच्या उभारणीसाठी आपले एक जोडे दान केले आहेत, ज्याचा हैदराबादच्या साप्ताहिक बाजारामध्ये लिलाव केला जाईल. निजाम साहेबांना ही माहिती मिळताच त्यांनी लाजून मालवीयजींना बोलावून त्यांची माफी मागितली व पाच लाख रुपये विद्यापीठासाठी दिले. मालवीयजींनी ती रक्कम काशी हिंदू विद्यापीठातील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी घरबांधणीसाठी वापरली आणि त्या वसाहतीला हैदराबाद कॉलनी असे नाव दिले, जी आजही तशीच आहे. मालवीयजींनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून शिकवण्यासाठी देशभरातील नामवंत विद्वानांना आमंत्रित केले होते. नवीन आधुनिक विषय शिकवण्यासाठी विविध नवीन विभागांची स्थापना करण्यात आली. त्यामुळे देशभरातून विद्यार्थी तेथे शिक्षणासाठी येऊ लागले. त्यावेळी तिथे शिक्षण घेणे ही प्रतिष्ठेची आणि अभिमानाची बाब समजली जाऊ लागली होती. त्यामुळे गाडगे बाबांच्या सामाजिक- शैक्षणिक कार्यांचा मालवीयजींवर खूप प्रभाव होता असे आपण म्हणू शकतो.
1943 मध्ये गाडगे बाबा बनारसला कीर्तनासाठी आले होते. पंडित मदन मोहन मालवीय यांना गाडगे बाबांच्या उपस्थितीची माहिती मिळाली. गाडगे बाबांच्या कार्याची कीर्ती मालवीयजींनी ऐकली होती. मालवीयजींनी त्यांना काशी हिंदू विद्यापीठात बोलावले. एका प्रख्यात वकिलाने गाडगे बाबांना आमंत्रण देणे म्हणजे बाबांच्या विचारांचा तो एक गौरव होता. दोन्ही महापुरुषांमध्ये सामाजिक- शैक्षणिक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. काही काळ ते काँग्रेसचे अध्यक्ष असल्याने या चर्चेला राष्ट्रीय पातळीवरील महत्त्व होते.
भेटी दरम्यान गाडगे बाबा मालवीयजींना म्हणाले की,
"पंडितजी, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन तुम्ही देशाची मोठी सेवा करत आहात. तुमच्या महान कार्याने मी खूप प्रभावित झालो आहे."
मालवीयजी उत्तरात म्हणाले की,
''बाबा, हा तुमचा मोठेपणा आहे, तुमच्या कामासमोर माझे काम फारच छोटे आहे."
रात्री काशी घाटावर झालेल्या कीर्तनात गाडगे बाबा म्हणाले की, 'काशीविश्वनाथाबरोबरच मालवीयजींच्या काशी विद्यापीठातही जावे. खरा विश्वनाथ तिथेच असतो, कारण तिथे देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात.'
असा बाबांचा शिक्षणाचा विचार होता. गाडगे बाबा हे अशिक्षित पण दूरदर्शी विचारवंत होते.
गाडगे महाराज व पंडित मदन मोहन मालवीय यांच्या भेटीतून आपल्या लक्षात येते की विचारांनी मोठी असणारी व्यक्ती चांगल्या गोष्टीचं कौतुक करायला अजिबात मागेपुढे पाहत नाहीत. गाडगे बाबांनी पंडित मदन मोहन मालवीय यांच्या शैक्षणिक कार्याचे मोठ्या उदार मनाने कौतुक केले व काशी हिंदू विद्यापीठाला लोकांनी आवर्जून भेट देण्याचे आवाहन केले. देवळातील देवाच्या दर्शनापेक्षा काशी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे शिक्षण गाडगे बाबांना अधिक महत्त्वाचे वाटत होते हे यातून दिसून येते. आजही मंदिरात होणारी गर्दी आणि शाळा विकासासाठी अनुदानाची तरतूद नसणे या दुरावस्थेत गाडगे बाबांचे विचार समाजमनात सक्षमपणे पेरण्याची गरज आहे.
गाडगे बाबांनी चांगल्याला चांगलं व वाईट गोष्टीला / वर्तनाला वाईट म्हणण्याची जी हिम्मत दाखवली, ती आज आपल्या अंगी जागविण्याची गरज आहे.
Debuji -The Inspiration
0 comments :
Post a Comment