गाडगे बाबांनी वऱ्हाडी बोलीचा प्रभावी वापर करत मराठी मातीत आपले सामाजिक व धार्मिक विचार पेरले. त्यांच्या कार्याची दखल घेत मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषेमध्ये विविध प्रकारचे साहित्य प्रकाशित झाले.
गाडगे बाबांच्या विचारांचा प्रभाव फ्रेंच भाषिक लेखकांवर देखील झालेला आपणास पाहायला मिळतो.
सन 1995 साली पॅरिस येथून प्रकाशित झालेले Jacki Assayag यांचे पुस्तक Au confluent de deux rivières : musulmans et hindous dans le sud de l'Inde हे फ्रेंच भाषेत असून त्यांनी आपल्या पुस्तकात गाडगे बाबांचा संदर्भ वापरलेला आहे. शैक्षणिक आणि धार्मिक विचार व्यक्त करताना लेखकाने गाडगे बाबा, चोखा मेळा या महाराष्ट्रातील संतांचा विशेष उल्लेख केलेला आहे.
फ्रेंच ही जगातील एक प्रमुख भाषा आहे आणि त्यात दर्जेदार साहित्यकृती पाहायला मिळतात. या भाषेतील एखाद्या पुस्तकात गाडगे बाबांच्या विचारांचा अंतर्भाव होणे ही खरच विशेष बाब आहे.
गाडगे बाबांचे विचार स्वच्छ आणि येथील मातीशी प्रामाणिक असल्याने त्यांचा निखळ प्रवाह जगात प्रवाहित झालेला आहे. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन अनेकांनी आपले आयुष्य सुंदर व संपन्न बनवले आहे. गाडगे बाबांचा हा अमूल्य ठेवा आपण जपला पाहिजे...जोपासला पाहिजे आणि मोठ्या मनाने पुढील पिढीकडे संक्रमित केला पाहिजे. ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
आपल्याकडे अनेक पुस्तकं बाबांच्या हयातीत लिहिली गेली. त्यांच्यासोबत अनेक मान्यवर व्यक्तींनी काम केले. त्यांच्या विविध आठवणी आजही लोकांकडे संग्रहात आहेत. परंतु त्या आठवणी कुलुपबंद असल्याने त्या समाजात पोहचत नाहीत. गाडगे बाबांचे विचार व आठवणी समाजात प्रसारित होण्यासाठी मनाचा मोठेपणा सर्वांनीच दाखविण्याची गरज आहे.
- राजू ठोकळ
Debuji -The Inspiration
0 comments :
Post a Comment