गाडगे बाबांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान

गाडगे बाबा यांचे राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदानावर टाकलेला एक प्रकाशझोत.....

आज पर्यंत प्रामुख्याने मी गाडगे बाबांना एक संत, समाजसुधारक या दृष्टिकोनातून पाहत होतो. त्यांनी केलेली किर्तनं ऐकण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची. यात सर्व जाती धर्मातील लोकांचा भरणा होता. कोणतीही अक्षरओळख नसलेले गाडगे बाबा शिक्षणविषयक कार्य हातात घेतात हा परिवर्तनवादी विचार समजून घेत असताना ते धर्मांधतेवर अगदी सहज आपल्या ओघवत्या शैलीत हल्ला करतात ही बाब मला जास्त भावते. हे सगळं समजून घेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या सारखा उच्चशिक्षित व सामाजिक पातळीवर मोठं काम असलेला व्यक्ती गाडगे बाबांचं कीर्तन ऐकायला येत होता हे मला थोडं चौकट सोडून विचार करायला भाग पाडतं.

ज्या काळात धार्मिक गोष्टींवर बोलणं पाप होतं, तेव्हा गाडगे बाबा त्या अनिष्ट प्रथांवर सहज हल्ला करत असत. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी जेव्हा या धर्मांध बाबींवर बोट ठेवले, तेव्हा समाजाने त्यांना किती त्रास दिला हे आपणास माहीत आहे. गाडगे बाबांनी देखील तो त्रास सुमारे दहा वर्षे सहन केला. लोकांनी त्यांच्यावर कोणी दगड फेकले, तर कोणी काठीने मारले. एकंदरीत ह्या सर्व गोष्टी सहन करत असताना त्यांची सामाजिक कार्याची चौकट अधिक बळकट होत गेली.

शिक्षण विषयक त्यांचे कार्य आज श्री गाडगे महाराज मिशन, मुंबईच्या माध्यमातून अविरत सुरू आहे हे आपण जाणतोच. तसेच गाडगे महाराज यांनी सुरू केलेले धर्मशाळा, वृध्दाश्रम यांचेही कार्य सुरू आहे. त्याचा विकासात्मक आलेख जो तो आपल्या परीने वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. असं असताना माझं मन त्यांच्या जीवनातील एका गोष्टीवर वारंवार विचार करायला भाग पाडतं. गाडगे बाबांच्या कीर्तनाला डॉ.बाबासाहेब आंबेकरांनी उपस्थिती नोंदविल्याचा प्रसंग मला गाडगे बाबांच्या इतर पैलूंवर विचार करायला भाग पाडतो. त्यात गाडगे बाबा यांनी देखील एका कीर्तनात म्हटले होते की जर मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर अगोदर भेटले असते, तर मी माझ्या शैक्षणिक कार्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असती. याच विचाराने त्यांनी आपली काही जागा पंढरपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दिली होती. हे प्रसंग अगदी सहज वाटत असले, तरी गाडगे बाबांच्या विचारात नक्कीच विलक्षण ताकद होती त्याशिवाय हे घडलेले नाही हे आपणास मान्य करावे लागते.

गाडगे बाबा जर तत्कालीन परिस्थितीत समाजातील अनिष्ट प्रथा, आरोग्य, शिक्षण या मुद्द्यांवर काम करत होते. हे जर आपण मान्य केले तर गाडगे बाबा इंग्रजांच्या राजवटीविरुदध काम करत नसतील हे मान्य करता येऊ शकत नाही. कारण त्या काळात येथील सावकार, जमिनदार यांना ब्रिटिशांचे संरक्षण होते. येथील न्यायव्यवस्था यांच्याच माध्यमातून सांभाळण्याचे काम ब्रिटिश करत होते. त्याच बळाच्या जोरावर हे सावकार, जमिनदार गोरगरीब शेतकरी वर्गाची पिळवणूक करत होते. याचाच त्रास गाडगे बाबांनी देखील अनुभवलेला होता. यातूनच पुढे सावकारांच्या विरोधात त्यांनी केलेले जनजागृतीचे काम म्हणजे जणूकाही त्या काळातील स्वातंत्र्याचे उठावच होते हे आपण समजून घेतले पाहिजे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील विविध ज्ञात अज्ञात वीरांचे बलिदान आहे. यात महात्मा गांधी यांच्या कार्याची आपणास चांगली ओळख आहे. गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानास अनेक विचारवंत, लेखक, कवी यांची लेखणी लाभल्याने त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला गेला. गाडगे बाबांच्या बाबतीत मात्र तसे झाले नाही. मुळात गाडगे बाबांना अशी प्रसिध्दी मान्य नव्हती. नाशिक येथील धर्मशाळेत त्यांचे काही छायाचित्रे व माहिती त्यांच्या सेवकाने संकलित केल्याची माहिती जेव्हा गाडगे बाबांना समजली, तेव्हा बाबांनी नाशिक गाठून सदर सर्व कागदपत्रे जाळून टाकली आणि हा ऐतिहासिक वारसा जळून खाक झाला.

गाडगे बाबांच्या कीर्तनातून प्रकटलेली तत्त्वे फक्त ग्रामीण भागासाठी सीमित नव्हती किंवा  गरीब वा उच्च जातींपुरती मर्यादितही नव्हती. तत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय कीर्तनकारांपैकी एक म्हणून गाडगे महाराज यांच्याकडे पाहिले जाते. ते एक निरक्षर शेतकरी व धोबी परीट जातीचे कीर्तनकार होते. मातीच्या, संभाषणात्मक आणि ग्रामीण उच्चारणाच्या शैलीत उपदेश आणि गायन करणारे, गाडगे महाराज एक अजब रसायन होते. जे देशातील वंचित सामाजिक वर्गासाठी विचारवंत, संघटक आणि शिक्षक होते.

गाडगे बाबांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान समजून घ्यायचे असतील तर महात्मा गांधी यांचा संदर्भ आपण घेणे उचित ठरते.  महात्मा गांधी भारतीय राजकारणातील एक महत्त्वाची व्यक्ती बनण्यापूर्वी, गाडगे महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करून ब्रिटिशांना अहिंसक प्रतिकार करण्याबाबत आपल्या कीर्तनातून लोकांना संबोधित केले होते. आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षणाचे महत्त्व सांगत असताना त्यांनी लोकांना सावकार, जमिनदार, मंदिरातला पुजारी, ब्रिटिश हे आपली कशी पिळवणूक करतात याची देखील जाणीव करून दिली. एकंदरीत अहिंसा, एकता, सत्य, न्याय या संकल्पना महाराष्ट्रातील जनतेच्या मनात रुजविण्याचे काम गाडगे बाबांनी महात्मा गांधींच्या अगोदर केले. हे कार्य करत असताना नंतर ते महात्मा गांधींचे समर्थक बनले, काँग्रेसच्या सभांना उपस्थित राहिले आणि स्वतःच्या राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. फैजपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात गाडगे बाबांना आमंत्रित केले गेले होते आणि तिथे उपस्थित राहून गाडगे बाबांनी ग्रामस्वच्छतेचे कार्य केले होते व त्यानंतर अधिवेशनात उपस्थितांना मार्गदर्शन केले होते. त्यांच्या कीर्तनांप्रमाणेच, गाडगे महाराजांची राजकीय शैली सर्वसमावेशक होती आणि त्यांनी लोकांना त्यांच्या स्थानिक आणि राष्ट्रीय समुदायाच्या हिताचे बदल करण्यासाठी एकत्र काम करण्याचे आव्हान दिले. सबाल्टर्न  वर्गांमधील पुरोगामी नेत्यांवर सखोल अभ्यास करणारे  थोर तत्त्वज्ञ ग्राम्सी यांनी गाडगे बाबांच्या या राष्ट्रीय चळवळीतील योगदानाबद्दल मत व्यक्त केलेले आहे.

आपण सर्वांनी श्री गाडगेबाबा यांना फक्त स्वच्छेतेचा संदेश देणारे आणि अंधश्रद्धा यावर टीका करणारे म्हणजे गाडगेबाबा. अश्या छोट्या परिघामध्ये गाडगेबाबांचे विचार  सिमित ठेवले आहेत. त्यांच्या जीवनप्रवासात 1905 ते 1956 या 51 वर्षांच्या काळात ते लाखो मैलांचा प्रवास करत लोकांच्या मनामधील अस्पृश्यता, अज्ञान, अनिष्ठरूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांची जळमटे कीर्तनाचे माध्यमातून साफ करण्याचे काम केले. भारतात जणू काही ते "सॉक्रेटीसच" होते.

मुळातच त्यांचे विचार क्रांतिकारक होते. त्यांच्या वाणीत प्रचंड ताकद होती. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख, आचार्य प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर अशी कितीतरी थोर माणसे गाडगेबाबांसोबत होती. बाबांचे समाजप्रबोधन कीर्तने ही लाहोर पर्यंत झालेली आहेत असे बऱ्याच लोकांकडून समजते. देशाबद्दलचे प्रेम तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सेनापती बापट यांचे सोबत  हिरीरीने भाग घेणारेही वैचारिक क्रांतिकारक संत श्री गाडगेबाबा होते.

गाडगे बाबांनी आपल्या कीर्तनातून जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती लोकांना दिली, त्याच पद्धतीने महात्मा गांधी यांच्याविषयी लोकांना संबोधित केले. 'गांधी बाबा एक भला माणूस आहे. त्याने इंग्रजांच्या विरोधात लढा उभारला आहे. त्या कार्यात तुम्ही सहभागी व्हा' असे आपल्या कीर्तनातून मांडत असत. स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी होण्याचे असे जाहीर आवाहन करणे फार हिमतीचे व जोखमीचे काम होते. ही जोखीम गाडगे बाबांनी स्वीकारली. स्वातंत्र्याची चळवळ, अहिंसेचे तत्त्व, स्वच्छतेचे महत्त्व, शिक्षणाचा दृष्टिकोन या सर्व बाबी स्वातंत्र्यपूर्व काळात समाजात जाऊन करणे हा एक प्रकारचा विद्रोह होता, जो इतर कोणत्याही क्रांतिकारकामध्ये आपणास दिसून येतो, तो मला गाडगे बाबांमध्ये होता असे मला वाटते.

गाडगे बाबा एक विज्ञानिष्ठ संत होते हे समजून घेत असतानाच आपण ते राष्ट्रीय चळवळीत देखील सहभागी होते हे आपण समजून घेतले पाहिजे.

- राजू ठोकळ




0 comments :

Post a Comment

 

Wikipedia

Search results

My Blog List

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Our Mission

गाडगे बाबांचे विज्ञानवादी व शैक्षणिक विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे हे आपले उद्दिष्ट आहे. गाडगे बाबा हे परिवर्तनवादी संत होते आणि त्यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे.

Popular Posts


गाडगे बाबा

गाडगे बाबा म्हणजे अन्याय, अत्याचाराने गांजलेल्या व अंधश्रद्धेत बुडालेल्या शोषित पिडीत समाजाला लोकशिक्षण देणारा लोकशिक्षक होय.

Followers

Contact Form

Name

Email *

Message *

Total Pageviews

Pages

Featured post

संत गाडगेबाबा: द्रष्टा वास्तुनिर्मितीकार

  संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या काळात समाजप्रबोधनाबरोबरच राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया,...

Translate

Books

  • आदिवासी मुलांचे शिक्षण
  • श्री संत गाडगे महाराज - प्रबोधनकार ठाकरे
  • श्री संत गाडगे महाराज
  • लोकशिक्षक गाडगे बाबा

Pages

Followers

External Links