हार्ट टू हार्ट संवाद हा गाडगे बाबांच्या कीर्तनाचा अनोखा पैलू होता.
गाडगे बाबांच्या कीर्तनाला लोकं जमवावी लागत नव्हती. ती आपोआप जमत होती. गाडगे बाबांचा संवाद हा 'हार्ट टू हार्ट' असल्याने लोकांना त्यांचं बोलणं जगणं वाटत होतं. आज काल माणसांचा संवाद या गोष्टीला मुकत असल्याने जग जवळ येऊनही माणसं मात्र दुरावत चालली आहेत. गाडगे बाबांनी समाजातील उणिवांवर, अंधश्रद्धेवर प्रहार करत माणसं जोडणं आणि घडवण्याचं काम केलं. आजच्या युगात आपण माणसातील उणिवांचं भांडवल करत दूषणं देत माणसाला अधिक दूर लोटण्याचा प्रयत्न करतो. गाडगे बाबांच्या विचारांनी काम करणाऱ्या माणसांनी लक्षात घेतलं पाहिजे की माणसाचा प्रभाव हा तो जिवंत असेपर्यंतच असतो. परंतु त्याने केलेल्या सामाजिक कार्याचा प्रभाव अनेक पिढयांत टिकून राहतो. गाडगे बाबा हे त्याचे अनोखे उदाहरण आहे. त्यांचे विचार घेऊन आज आपण सर्व कार्यरत आहोत.
जन्माला आलेला माणूस एक दिवस मरणारच आहे. परंतु त्याचं मरण एक सोहळा व्हावा असं वाटत असेल तर माणसाने गाडगे बाबांचे विचार प्रत्यक्षात जगले पाहिजेत. 'हार्ट टू हार्ट' संवाद साधत माणसाला जोडण्यासाठी आणि देशाला - समाजाला घडविण्यासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे.

0 comments :
Post a Comment