प्रस्तावना :
२३ फेब्रुवारी, १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातल्या शेंडगाव या छोट्याशा गावातील एका परीटाच्या घरात गाडगेबाबांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर.
बुधवार दि. १ फेब्रुवारी,१९०५ ला पहाटे 3 वाजता बायको पोरांचा संसार सोडून डेबुजी घराबाहेर पडले. तेव्हापासून २० डिसेंबर,१९५६ ला देहावसान होईपर्यंत अर्धशतकाहून अधिक काळ नागपूर ते कोल्हापूर दरम्यानच्या खेड्यापाड्यातला महाराष्ट्र त्यांनी समजून घेतला. दिवसा खेड्यातला काडीकचरा, शेण, घाण आपल्या खराट्याने स्वच्छ करायची आणि रात्री कीर्तनातून लोकमानसावरची जळमटं काढायची. असा त्यांचा नित्यनम असे. अंगात रंगीबेरंगी चिंध्यांचा अंगरखा, कानात फुटकी कवडी, डोक्यावर मातीच्या फुटक्या भांड्याचे खापर, हातात काठी अशा वेशातले गाडगेबाबा कीर्तनाला उभे राहिले की, बडी-बडी मंडळी जमीनीवर मांडी घालून ऐकायला बसायची. अश्या बड्या मं डळीत प्रसिध्द लेखक प्र. के. अत्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख अशी थोर माणसं असायची. कर्मयोगी गाडगे बाबा कृतीशिल लोकशिक्षक होते. मुंबईच्या ब्रांद्रा स्टेशनवर रेल्वे पोलीस वसाहतीत दि. ८ सप्टेंबर,१९५६ रोजी बाबांचे अखेरचे कीर्तन झाले. अमेरिकेहून आलेल्या एका पारशी व्यक्तीने बाबांचे कीर्तन रेकॉर्ड केले होते. त्यानंतर मुंबईच्या अमरानंद कंपनीने कॅसेटच्या रूपात त्याचा प्रसार केला. मात्र कालांतराने त्या कॅसेटस् संपल्या. परंतु डॉ. एकनाथ ठाकूर आणि श्री. गुणवंतबाबा चर्हाटे यांच्या माध्यमातून कॅसेट उपलब्ध झाली. महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नातून श्री. कमलाकर जगताप यांनी बाबांच्या मूळ आवाजातील कीर्तन आज कॅसेट व सीडीच्या रूपात उपलब्ध करून दिले आहे. त्याची मुद्रित संहिताही तयार करण्यात आली. अखेरच्या कीर्तनातील गाडगेबाबांच्या व्यावहारिक आणि आर्थिक विचारांचा शोध प्रस्तुत निबंधात घेण्याचा प्रयत्न केला आहे.
____________________________________________
उद्दिष्ट :
गाडगे बाबांच्या अखेरच्या कीर्तनातील व्यावहारिक आर्थिक विचारांचे अध्ययन करणे.
____________________________________________
पैसा कमवाव का .... ? :
माणसं आयुष्यभर मर-मर करून पैसे कमवतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चार पुरूषार्थापैकी केवळ अर्थ ह्या एकाच पुरूषार्थाला महत्व देणं हे माणसाच्या आयुष्याचं सार्थक नव्हे. माणसाला जगण्यासाठी पैसा लागतो. त्यासाठी प्रत्येक माणसाला शारीरिक किंवा बौध्दिक श्रम करावेच लागतात. पण पैसे कमावणं हे एकमेव श्रेष्ठ जीवनमूल्य नाही. संत गाडगेबाबा तुकाराम महाराजांचा संदर्भ देत खडे बोल सुनावतात -
‘‘मानसाच्या जल्मात आल्यावर आपन काय कराव ? पैसा कमवाव् का बायको पोरं पोसूनच मराव, का सग्या सोयर्यांचा गनगोताचा मेळ करून ह्यांच्यातच आयुष्य घालवाव् ? तरी मानसाच्या जल्मात येऊन जो मनुष्य देवाचं भजन करील-तुकोबाराय म्हनतात, तो देव होईल देव !’’
____________________________________________
पैसे की धुलधानी :
लोक आपल्या जवळचा असला- नसला सर्व पैसा तीर्थयात्रेवर खर्च करतात. प्रसंगी त्याकरिता कर्ज काढतात. अशा तीर्थयात्रांवर खर्च करणे हा पैशाचा नाश आहे. गाडगेबाबांच्या मते तीर्थात देव बसवले हे खरे देव नाहीत. ते पोट भरण्याचे देव आहेत. तेथे भटजी लोक तीर्थ विकतात. एक चमचा तीर्थाचे दोन आणे. तांब्याभर पाणी विकून ते पंधरा रूपये वसूल करतात. स्वत:चं पोट भरतात. हा देवाचा बाजार आहे. संत गाडगे बाबा देवाच्या अस्तित्वाविषयी म्हणतात,
‘‘पुथई पैदा झाली ताहापासून देव कोनं पाह्याला नाही. देव कोनाले दिसणार नाही - देव पाह्याची वस्तु नाही.....
देव देव करता शिनले माहे मऽन !
देव देव म्हनून तुकोबा म्हनतत, मी खूप फिरलो मले शिन आला, पन देव नाही दिसला. मंग दिसले काय ?
पानी आणि पाषाण जेथे ...... तेऽथे ....
कबीर पुरावा देतत -
जत्रामे फत्रा बिठाया तिरथ बनाया पाऽनी ।
दुनिया भाई दिवानी पैसे की धुलधानी ॥
तीर्थाले जानं देवाचा संबंध नाही. पैशाचा नाश-खाना खराब आहे.’’
____________________________________________
पैशाचा अभिमान :
गाडगेबाबांच्या मतानुसार पुढील तीन पैकी कोणतीही एक गोष्ट माणसाजवळ असली तरी माणूस गर्विष्ठ होतो. त्यातली एक गोष्ट आहे पैसा. गाडगे बाबा म्हणतात.
‘‘पहिलवानीत अभिमान असते-मै पहेलवान हूं ! पैशाचा अभिमान असते. अं बलदारीचा अभिमान असते. हे तर्हेतर्हेचे अभिमान असते. ज्याच्या अंगात अभिमान नसील, तर तो मनुष्य देव होते पुढे.’’
ज्याचा अभिमान ....... गेऽला ।
अन् तुका म्हणे देव ....... झाला ॥
____________________________________________
पन्नास पन्नास कोट रूपयाची आगबोट :
गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून अंध:श्रध्देवर कठोर प्रहार केले. प्रखर टीका केली. म्हसोबा, मरीआई अशा ग्राम दैवतांच्या निर्मुलनावर भर दिला. सत्यनारायणाची असत्यता तर्कशुध्द पध्दतीने पटवून दिली. सत्यनारायण ही देवाची भक्ति नाही. जे लोक लोभी असतात ते सत्यनारायण करतात. कुणाला मुलगा नाही, कुणापाशी गाडी नाही, कुणाच्या हातात पैसा मिळत नाही, कुणाला एखादी जागा मिळत नाही, ते लोक सत्यनारायण करतात. साधु वाण्यानं अडीच रूपयाचा सत्यनारायण केला. प्रसाद घेतला, त्याची करोडो रूपयांची बुडालेली नौका वर आली. संत गाडगे बाबा म्हणतात,
‘‘नाही नाही. हे खरं नाही ! ज्या साली लढाई झाली. त्यासाली, लढाईच्या साली समुद्रात एकेक आगबोट, पन्नास पन्नास कोट रूपयांची पार तळाला गेली. पत्ता नाही. अशा किती आगबोटी बुडाल्या. सत्यनारायन करनार्या महाराजाले म्हनाव् अडीच रूपये घेऊन कशाला एवढी बडबड करता- अडीच लाख रूपये घ्या - अडीच कोट रूपये घ् या- समुद्राच्या किनार्यावर एक सत्यनारायन करा अन् एक आगबोट आना वर. जमेल का ?’’
____________________________________________
जेवढे पैसे पडतील तेवढे पडू द्या :
माणसं देऊळ बांधतात. त्या देवळात देवाची मुर्ती बसवतात. मुर्ती काय फुकट मिळते ? ती विकत घ्यावी लागते. प्रश्नोत्तर रूपानं अशा प्रकारची उत्तरं श्रोत्यांकडून काढून घेत गाडगेबाबा म्हणतात,
‘मंग मुर्ती इकत की फुकट ?
- इकऽत!
देव इकत भेटत असते ? सांगा ! मंग देव इकत न घेता सुर्यनारायन घ्याव ! जेवढे पैसे पडतील तेवढे पडू द्या. अन् आपल्या घरात आनून बसवून टाका ! देव इकत भेटते का ? मेथीची भाजी होय, का कांदे-बटाटे होयेत ? देव इकत भेटते, हेही समजत नाही ज्या मानसाले, तो मानूसच कसा !’’
____________________________________________
इस्टेट आणि धन :
पंढरपूर, मुर्तिजापूर, नाशिक, आळंदी, देहू, पुणे, त्र्यंबकेश्वर, मुंबई येथे लोकवर्गणीतून गाडगेबाबांनी धर्मशाळा बांधल्या. मुर्तिजापूर, नागरवाडी, राहूरी येथे गोरक्षण सुरू केले. ही सर्व संपत्ती कोट्यावधी रूपयांची आहे.
एकदा वर्ध्याला महात्मा गांधीजींसोबत गाडगे बाबांची भेट झाली. गांधीजींनी बाबांना विचारले, ‘‘तुम्ही इतके रूपये जमविले. तुमची इस्टेट किती ?’’
दोन्ही हात गांधीजी पुढे उंचावून बाबा म्हणाले, ‘‘हे हाये माही इस्टेट! ’’तेव्हा गाडगेबाबांच्या डाव्या हातात होते मातीचे खापर आणि उजव्या हातात होती लाकडाची काठी. ह्या प्रसंगानंतर काही वर्षांनी महात्माजींचा खून झाला. आपल्या अखेरच्या कीर्तनात महात्माजींबद्दल बाबा म्हणाले,
‘दस मिनिट, दस मिनिट में सब पुर्थईभर पसारा- गांधीजीका खून हो गया ! महात्माजी ..... गये ऽऽ ऽ ! महात्माजी ...... गये ऽऽऽ! महात्माजी गये ! दस मिनिट में. हम ऐसे है, इस घर में हम मर गये, तो पीछेके घरवालेकू छे महिने नही मालूम होता. उसके घरकू सगेवाले आते, रोते. क्या हुवा हो ? वो गनपतसिंग कल रातकू मर गया. अरे, हमकू मालूमही नही. जैसा कुत्ता मर गया साला ! मानसाचं धन तिजोरी नाही, सोनं नाही, हिरे नाही, मोटर नाही ! मानसाचं धन कीर्ती ! कबीर पुरावा देत,
‘‘सूरत से कीरत बडी बिनपंख उड जाऽय ।
सूरती तो जाती रही कीरती कबू ना जाऽय ॥
जबलग सुरज चाँद है पुर्थई पर, तबलग गांधी मरते नही. गांधीजी जिंदे है. मरने-वाले, आनेवाले, जानेवाले हम है. गांधीजीकू मरनच नाही.’’
____________________________________________
गरिबीचं कारण आणि शिक्षण खर्चाचे नियोजन :
१९३६-३७ च्या सुमारास नाशिक नगरपालिकेत बाबांचं एक कीर्तन झालं. पूर्वरगांचा विषय होता ‘‘शिक्षणाचे संस्कार झाल्याखेरीज माणसाला मनुष्यत्व येत नाही.’’उत्तर रंगात बाबांनी आख्यान लावलं ते महात्मा जोतिबा फुल्यांचं. शिक्षणाकरता तळमळणारा शेतकरी असं त्यांनी जोतिबांचं वर्णन केलं होत.
शुद्रांच्या खचन्याचं कारण विद्या नसणं हे आहे. हे महात्मा जोतिबा फुल्यांचं सूत्र गाडगे बाबांनी आपल्या अखेरच्या कीर्तनात मांडलं. ते म्हणतात,
‘‘ हे लोक का गरिबीत राहिले ? एक तर याहिले नाही विद्या. काय नाही ?
- विऽद्या !
ज्याले विद्या नसेल त्याले खटार्याचा बैल म्हटलं तरी-
- चालेऽल ! ’’
डाक्टर आंबेडकर साहेब, यांच्या पिढ्यान् पिढीत झाडू मारायचं काम केलं. यांच्या वडिलाले सुबुध्दी सुचली आणि आंबेडकर साहेबाले शाळेत घातलं. आंबेडकर साहेबानं काही लहानसान कमाई नाही केली. हिन्दुस्थानची घटना केली घटना, अन् तेच शाळेत जाते ना, अन् शिकते ना, तर झाडू मारनंच त्यांच्या कर्मात होतं. विद्या मोठं धन आहे. जेवनाचं ताट मोडा, बायकोला लुगडं कमी भावाचं घ्या. मोडक्या घरात रहा. पन मुलाले शिक्षन दिल्याविने सोडू - नऽ का.
____________________________________________
जमाखर्च :
अवघाचि संसार सुखाचा करण्यासाठी गाडगेबाबांनी बचतीचा महामंत्र दिला. काटकसरीची शिकवण दिली. बचतीचं अर्थशास्त्र समाजशास्त्राच्या अंगानं सांगितलं. बाबा म्हणतात,
‘‘मारवाडी, गुजराथी, ब्राम्हण, भाटे हे का रोज तुपातला शिरा खातत ? त्यांच्या घरी जमाखर्च आहे. काय ? ‘
- जमा ऽ खर्च !
उत्पन्न किती अन खर्च किती याची लैन मालूम आहे. अन् आमच्या मराठ्याले, तेल्या, माळ्या न्हाव्या, धोब्याले - याले जमाखर्च समजतच नाही. यांचं कसं आहे ? पौ नसे रूपये उत्पन्न, आणि ऐंशी रूपये नव्वद रूपये खर्च ! जानेवारीत मजा करा आणि फेपरवारीत बोंबलत बसा. काटकसर पाहिजे. घरी जमाखर्च पाहिजे. लइ जन म्हनतात पगार पुरत नाही. पगार पुरत -
- ना ऽ ही !
पगार सरतच नाही. असं म्हटलं पाहिजे ज्या घरात नवरा बायको बुध्दिमान, अक्कलवान असतील, तिथं पगार सरत नाही. शिल्लक पेटीत टाकली पाहिजे.’’
____________________________________________
रूपया मोडून दारू प्याला :
बहुजन समाजाचं दारूनं कसं वाटोळं केलं हे गाडगे बाबांनी उघड्या डोळ्यांनी समाजात पाहिलं होतं. ह्याच दारूच्या पायी आपल्या वडिलांनी संसाराची केलेली राखरां गोळी बाबांनी लहानपणी अनुभवली होती. त्यामुळे दारू पिणार्यांविषयी बाबांच्या मनात प्रचं ड चीड होती. बाप दारू पिऊन येत असेल तर बाप-लेकाचं नातं विसरून लेकानं बापाला जोड्यानं मारल पाहिजे. असं सांगून बाबा म्हणतात -
‘‘ज्या दारूनं करोडपतीचा खानाखराब केला, राजपुत्र मारले, राजवाडे ओसाड पाडले, त्या दारूच्या सावलीत उभं राहू नका .... दारू पिईल तो बाप नाही. लख्खो धन्यानं आपल्या आजाच्या, बापाच्या हातच्या जमिनी पार गमावल्या आन हमाली करून राहिले हमाली !
दिडकी दे ना धर्मा ऽ ला ॥
रूपया मोडून दारू प्याला ॥
... जे जे दारू पितील त्यांचा खाना खराब झाल्याविना कधी राहनार -- ना ऽ ही !’’
____________________________________________
सारांश :
भारतीय समाजाला वर्षानुवर्षे लागलेली कीड म्हणजे विविध प्रकारची व्यसने, देवपूजा परिणामी अंधश्रध्देत वाढ. मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम समाजव्यवस्थेवर होतात हे आपल्या बोली भाषेतून उभ्या महाराष्ट्राला गाडगे बाबांनी पटवून दिले. आपला व्यवसाय, नोकरी करीत आपले व्यावसायिक, सामाजिक आणि आ र्थिक व्यवहार काटकसरीने केले पाहिजेत हे विविध दाखले देवून त्यांनी पटवून दिले. स माजमनावरील जळमटे दूर केलीत. म्हणूनच त्यांना चालते - बोलते विद्यापीठ संबोधले जाते. आपल्या कृतीव्दारे त्यांनी लहान - थोरांना आपलेसे करून घेतले होते. समाजाचे प्रत्यक्ष अध्ययन करूनच त्यांनी जनमाणसाला शिक्षित करण्याचे महान कार्य विविध पातळ्यांवर केले आहे.
____________________________________________
डॉ. महेश चं. डाबरे,
अकोला


0 comments :
Post a Comment