गाडगे बाबांच्या दशसूत्रीची आज समाजाला गरज....
एकीकडे स्वप्न विकासाचे, महासत्तेचे दाखवले जाते पण दुसरीकडे देशात अंधश्रद्धा, अस्वच्छता, निरक्षरता, व्यसनाधीनता, उपासमार, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वृद्धाश्रमांचे वाढते प्रमाण, धार्मिक संघर्ष व दारिद्रय़ाचे संकट समाजापुढे उभे आहे. गाडगेबाबांनी १०० वर्षांपूर्वी सांगितले की, भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघडय़ानागडय़ांना वस्त्र, बेघरांना आसरा, बेकारांना रोजगार, गरीब मुलामुलींना शिक्षण, गरीब तरुण-तरुणीचे लग्न, अंध, अपंग, रोगी यांना औषधोपचार, मुक्या प्राण्यांना अभय आणि दुःखी व निराशितांना हिंमत या बाबांच्या दशसूत्रीच्या पूर्ततेशिवाय महासत्तेचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही.
आजच्या जागतिकीकरणाच्या प्रचंड स्पर्धेच्या युगात आधुनिक मानवाला गाडगेबाबांसारख्या निरक्षर व्यक्तींच्या विचारांची गरज काय? असा प्रश्न निर्माण होतो. या विज्ञानाच्या युगात माणूस माणुसकीला पारखा झाला आहे. एका विचारवंताने म्हटले आहे की, पाण्याच्या व अन्नाच्या दुष्काळामुळे मनुष्य व मुके प्राणी मरतात, पण विचाराच्या व संस्काराच्या अभावामुळे मानवतावाद व संस्कृतीच लयाला जाते. मानवतावादाची जपणूक करण्यासाठी गाडगेबाबांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे.
एकीकडे स्वप्न विकासाचे, महासत्तेचे, पण दुसरीकडे देशात अंधश्रद्धा, अस्वच्छता, निरक्षरता, व्यसनाधीनता, उपासमार, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वृद्धाश्रमांचे वाढते प्रमाण, धार्मिक संघर्ष व दारिद्रय़ाचे संकट समाजापुढे उभे आहे. गाडगेबाबांनी १०० वर्षांपूर्वी सांगितले की, भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघडय़ानागडय़ांना वस्त्र, बेघरांना आसरा, बेकारांना रोजगार, गरीब मुलामुलींना शिक्षण, गरीब तरुण-तरुणीचे लग्न, अंध, अपंग, रोगी यांना औषधोपचार, मुक्या प्राण्यांना अभय आणि दुःखी व निराशितांना हिंमत या बाबांच्या दशसूत्रीच्या पूर्ततेशिवाय महासत्तेचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही.
गाडगेबाबा हे स्वच्छतेचे दूत होते. १९०५ ला गृहत्याग केल्यानंतर समाजजीवनाचे निरीक्षण परीक्षण केले. त्यांना लोकोद्धाराची व लोककल्याणाची तळमळ होती. स्वच्छतेवर बाबांचा कटाक्ष होता. त्यांनी हातात खराटा घेऊन समाजातील घाण साफ केली. बाबांनी स्वच्छतेच्या माध्यमातून जनमानसात श्रमप्रतिष्ठेचे बीजारोपण केले. बाबांना श्रमातून स्वावलंबन, स्वावलंबनातून स्वाभिमान, स्वाभिमानातून स्व-उद्धार, स्व-उद्धारातून देश उद्धार ही विचारक्रांती साधावयाची होती. शंभर वर्षांपूर्वी सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवून खरी श्रद्धांजली अर्पण केली. म्हणून तर गाडगेबाबांना ‘खराटय़ांचा बादशहा’ हे नामाभिधान योग्य ठरते.
गाडगेबाबा हे बंडखोर विचारांचे होते. बुद्धीवादी व विज्ञानवादी होत. अंधश्रद्धेला बाबांजवळ मुळीच थारा नव्हता. त्यांनी समाजाच्या देवभोळेपणावर शरसंधान केले. अंगारे, धुपारे, मरीआई, पीर, अंगात येणारे देव यांवर टीका करून समाजात जागृती करण्याचे कार्य केले. समाज अशिक्षित व धर्मश्रद्ध असल्यामुळे अनिष्ट रूढी, परंपरा व नवसाला बळी पडला होता. नवसाची पूर्ती करण्यासाठी मुक्या प्राण्यांची हिंसा मोठय़ा प्रमाणात होत असे. विदर्भात तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर बाबांनी बहिरम, उपराई, दर्यापूर, दुर्गवाडा, दोनद इत्यादी ठिकाणी हिंसाबंदी घडवून आणली. हिंसाबंदीचे कार्य हे बाबांचे वैशिष्टय़पूर्ण सेवाकार्य होय.
बाबांनी समाजातील अंधश्रद्धेबरोबर व्यसनाधीनतेवर हल्ला चढविला. समाजातील चंगळवाद जेव्हा विकोपाला पोहोचतो तेव्हा तो समाज अधोगतीकडे वाटचाल करीत असतो हे बाबांनी ओळखले होते. व्यसनमुक्त समाज हे देशाचे भूषण असते म्हणून व्यसनाच्या नादी लागून आपले जीवन बरबाद करणाऱ्या लोकांना कळवळून बाबा म्हणत असत –
दारू पेते, तमाशात नाचते
लौंढीच्या नादीत धिंगाणा करते
जनावर बरी बापा खुटयाले जगे
माणूस तर बायकापोराले इकून खाते
याची जाणीव त्यांनी अज्ञ समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून करून दिली. अज्ञानमुक्ती, कर्जमुक्ती, कर्मकांडमुक्ती, दारिद्रय़मुक्ती या चार मुक्तींबरोबर व्यसनमुक्तीचा लढा उभारून समाज जीवनाला येणारी मरणकळा थोपविण्याचा प्रयत्न केला.
हिंदुस्थानातील बहुसंख्य समाज हा खेडय़ात राहतो. खेडय़ात मोठय़ा फ्रमाणात अंधश्रद्धा, व्यसने, दारिद्रय़ यांच्या शृंखला अत्यंत घट्ट होत्या. त्याचे प्रमुख कारण म्हणजे अज्ञान होय. अज्ञान हा मोठा रोग आहे. त्यावर रामबाण औषध म्हणजे शिक्षण होय. नवसमाज निर्मितीसाठी शिक्षणाची गरज आहे हे बाबांनी ओळखले होते. शिक्षणाविषयी बाबा म्हणतात, ‘‘शेंदूर फासल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही. त्याचप्रमाणे शिक्षणाचे संस्कार झाल्याशिवाय मनुष्याला मनुष्यत्व येत नाही.’’ पुढे बाबा म्हणतात, ‘‘चौऱ्याएंशी रोगांवर शिक्षण हाच रामबाण उपाय आहे. अशिक्षित माणसात आणि जनावरात काहीएक फरक नाही. अशिक्षित माणसाला सावकार बुडवितो, सरकारी नोकर दरडावतो, लबाड लोक गवतात. तुम्हाला स्वाभिमानाचे जिणे जगायचे असेल तर माझ्या मायबापांनो, शिक्षण घ्या. लहान असा, मोठे असा, स्त्री असा, पुरुष असा, पण शिक्षण घेतल्याशिवाय राहू नका. म्हणजेच शिक्षण हे समाजाचे सर्वांगीण उन्नतीचे साधन होय. अज्ञानाला सज्ञान बनविण्यासाठी त्यांना सक्तीचे शिक्षण दिले पाहिजे अशी संकल्पना बाबांना अभिप्रेत होती.
आज साधूमहाराजांचे पेव फुटले आहे. इतर साधूमहाराज स्वतःचा मठ, मंदिर आणि आश्रम उभारतात, पण बाबांनी मठ, मंदिर किंवा आश्रम उभारले नाहीत, तर जगण्याच्या सोयी निर्माण केल्या. शाळा, वसतिगृहे, ग्रंथालये, धर्मशाळा, दवाखाने, कुष्ठधाम, वृद्धाश्रम, गोरक्षण, पाणपोयी, नदीवरील घाट इत्यादी लोकोपयोगी कार्य बाबांनी केले. हे सर्व कार्य त्यांनी लोकवर्गणीतून लोकांना अर्पण केले. हे कार्य चिरतंन टिकून राहण्यासाठी गाडगे महाराज मिशनची स्थापना केली. गाडगेबाबांचे कार्य पाहता ते निष्काम कर्मयोगी होते.
या ठिकाणी विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते की, संत गाडगेबाबा आणि ठाकरे कुटुंबीय यांचा वैचारिक स्नेह अगदी घनिष्ठ होता. प्रबोधनकार ठाकरे यांनी अनेक पुस्तके लिहिली, पण चरित्र केवळ एकच लिहिले ते गाडगेबाबांचे. त्या चरित्राच्या मुखपृष्ठावर रेखाटलेले चित्र शिवसेनाप्रमुखांनी काढले आहे. काही दिवसांपूर्वी त्याच पुस्तकाच्या अलीकडच्या आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव ठाकरे यांनी प्रकाशन केले.
संत गाडगेबाबांच्या कार्याचे विस्मरण होणे अशक्य आहे. त्यांनी जनताजनार्दनासाठी केलेले कार्य अनमोल ठेवाच आहे. आपल्याला विकसित हिंदुस्थान घडवायचा असेल तर बाबांचे विचार व कार्य खेडय़ापाडय़ांत घरोघरी संपूर्ण देशभर पोहोचविले पाहिजे.
(लेखक मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयात इतिहास विभागप्रमुख आहेत.)

0 comments :
Post a Comment