गाडगे बाबांच्या जीवनाचा प्रत्येक पैलू आजच्या काळात आपल्याला दिशादर्शक आहे.
कमालीचा निसंगपणा अनं पराकोटीचा निर्भिडपणा गाडगे बाबांच्या अंगी होता. कुणाची भीडभाड वा तमा त्यांनी कधी बाळगली नाही. चुकीला चूक व बरोबरला बरोबर म्हणण्याची हिंमत ते नेहमी दाखवत. समयसूचकता हा त्यांच्या सामाजिक कार्याचा आरसा होता. जो त्यांनी आयुष्यभर जपला. याबाबत त्यांच्या जीवनातील एक प्रसंग आपणास खूप काही शिकवून जातो.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षणसंस्थेचं अनुदान तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी बंद केले. ही बाब गाडगे बाबांना समजताच, त्यांनी बाळासाहेब खेर यांची भेट घेऊन समाचार घेतला. पण त्याआधी सातारा गाठून भाऊरावांना एक लाखाची देणगी दिली व त्यांना आश्वस्त करीत म्हटले, ‘हा गाडगे बाबा आहे तोवर तुला पैशाची कमतरता पडू देणार नाही’ आणि त्यानंतर खेर पुण्याला आले असता पुण्याला जाऊन, त्यांना मिटींगमधून बाहेर बोलावून त्यांची कान उघाडणीही केली. ज्यामुळे खेरांनी बंद केलेलं अनुदान तातडीने सुरु केलं.
फाटक्या चिंध्या परिधान केलेल्या असल्या, तरी मन मात्र साफ होतं. म्हणून मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीनं गाडगे बाबांचं बोलणं ऐकून घेतलं व झालेली चूक मान्य केली. आजच्या काळात हा निर्भीडपणा व समयसूचकता अपवादानेच पाहायला मिळते. आज बहुतांशी लोकं उच्च पदावरील लोकांचे पूजक झाल्याने त्यांनी घेतलेला निर्णय मग तो चुकीचा का असेना तो बरोबर आहे असे लोकांना पटवून देण्यात धन्यता मानतात. यामुळे आज समाजाचं प्रचंड नुकसान होत आहे.
गाडगे बाबांनी आयुष्यभर दाखवलेली समयसूचकता वाखाणण्याजोगी आहे. कोणत्या गोष्टीला प्राधान्यक्रम द्यायचा हे त्यांना कळत होतं. त्यामुळे तानाजी मालुसरेंसारखं आधी लगीन कोंडाण्याचं या न्यायाने आधी भाऊरावांना आर्थिक मदत पोहचवून व नंतर खेरांचा त्यांनी समाचार घेतला या घटनेतून आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पडतं. आज आपण उच्च शिक्षित असताना अशी कोणाची त्याच्या चुकीबद्दल कानउघाडणी केली आहे का हा प्रश्न विचारायला भाग पडतो. कमीत कमी आपल्या हातून झालेली चूक जशी तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी मान्य केली, तशी चूक मान्य करण्याचा मोठेपणा तरी आपल्या मनात आहे का याचा विचार होणे आवश्यक आहे. एकंदरीत गाडगे बाबांच्या जीवनाचा प्रत्येक पैलू आजच्या काळात आपल्याला दिशादर्शक आहे.

0 comments :
Post a Comment