आपल्या मनातील गाडगे बाबा जागविण्यासाठी पुढील प्रसंगांतून बाबांची विचार करण्याची व त्यानुसार कृती करण्याची पद्धत समजून घेतली पाहिजे...
आपल्या जीवन व्यवहाराचा गाडा चालवीत असतानाच, गाडगे बाबा एका विशेष दृष्टिकोणातून सभोवारच्या समाज-जीवनाची सूक्ष्म पाहणी करण्यात गुंग होत असत. ही संवेदनशीलता आपण समजून घेऊन आपल्यात विकसित केल्याशिवाय आपलं जीवन बदलत नाही.
गाडगे बाबांची जमीन सावकाराच्या घशात गेली होती. त्यामुळे रात्र आणि दिवस कष्ट करून देखील घरातील समस्या सुटत नव्हत्या. आज आपल्या सभोवताली अशी अनेक उदाहरणे दिसतील. कदाचित या विचाराचे आपण देखील असाल. या प्रसंगात गाडगे बाबांच्या मनात पुढील प्रश्न वारंवार येऊ लागला....
संसाराचा हा मामुली गाडा हयातभर असाच हाकत राहायचे काय?
आपल्या मनात हा प्रश्न येत नसेल तर यापुढील काळात आला पाहिजे इतकी चिकित्सक विचार प्रक्रिया आपण आत्मसात केली पाहिजे.
रोजमर्रा जिंदगीच्या फेऱ्यात आपण अडकलो आहोत. तसेच गाडगे बाबांची देखील सुटका यातून झाली नव्हती.
जन्माला आल्यासारखे मला आणखी काही करता येण्यासारखे नाही काय?
हा प्रश्न गाडगे बाबांना झोपू देत नव्हता.
'आणखी काही’ म्हणजे तरी नक्की काय ?
गाडगे बाबांना देखील याबाबत काही उमगत नव्हते. आज आपली अवस्था इतक्या अत्याधुनिक सुविधा असताना तशीच झाली आहे. सर्व काही असूनही आपण निश्चिंतपणे झोपू शकत नाही. अनेकांना तर गोळ्या खाऊन झोप येण्याची वाट पाहावी लागते.
माझे सर्व काही ठीकठाक चालले असले म्हणजे आजूबाजूलाही सर्व काही आलबेल आहे असे थोडेच?
गाडगे बाबा स्वतःच्या जगण्यावरून समाजाची मांडणी करणाऱ्यातले नव्हते हे वरील प्रश्नावरून समजून येते. आज आपण असला सामाजिक विचार करतो का हे अंतर्मुख होऊन ठरविणे आवश्यक आहे.
जिकडे नजर टाकावी तिकडे दैन्य, दारिद्र्य, अज्ञान, सावकारांच्या तिजो-या फुगवून कष्टकरी, शेतकरी स्वतः अन्नवस्त्राला महाग आहेत हे गाडगे बाबांना उमगले होते. त्याने ते काहीसे व्यथित होत होते. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा इतक्या बारकाईने आपण आढावा घेतो का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे.
अन्याय, लाचलुचपत, पैशासाठी इमान विकणारे बाया बाप्ये, टीचभर स्वार्थासाठी दुस-याचे गळे कापणारे महाजन! अन्यायाला, खोट्यानाट्याला प्रतिकार करायचीही हिंमत कोणात नाही हे गाडगे बाबांच्या लक्षात आले होते. अनेक घाणेरड्या रूढी, देवकार्यातले अत्याचार, गांजा-दारूचा भरमसाट फैलावा, देवधर्माच्या नावावर हज्जारो पशूंची हत्या गावोगाव राजरोस चाललेली... कोणीच या पापांच्या परवडीला थोपवीत नाही. मला काही करता येईल का?
वरील विचार करून बाबांचा जीव एकटा तडफडत असे. आजही त्यातील अनेक गोष्टी तशात आहेत. आपण तडफडतो का? आपल्यात आहे की ही सामाजिक तळमळ? अंतर्मुख व्हावं लागेल... तरच समाज आपल्या विचारांना स्वीकारणार आहे.
पायात संसाराची बेडी भक्कम खळाळत आहे. काहीतरी केलं पाहिजे खरं. हरकत नाही तेवढ्यासाठी जिवाची हवी ती किंमत द्यावी लागली तरी. प्राण खर्ची घालावे, उघड्या डोळ्यांनी संसाराला आग लावावी, पण समाजातली ही शेकडो पातके खरचटून नाहीशी करावी. साधेल मला हे? कोण मला मार्ग दाखवील? या नि असल्या विचारांनी डेबुजी रात्रंदिवस बहरलेला असे. आज आपल्याही पायात संसाराची बेडी आहे. बायकोला कोणत्या रंगाची साडी घ्यायची? मुलाला कोणत्या शाळेत टाकायचे? कोणते दागिने खरेदी करता येतील? कोणत्या गुंतवणूकीने पैसे दुप्पट होतील? गाडी कोणती घ्यायची? फ्लॅट वन बीएचके घ्यायचा की टुबीएचके घ्यायचा? इन्कम टॅक्स कसा कमी करता येईल? यापेक्षा वेगळे प्रश्न पडतात का आपल्याला?
गाडगे बाबा समाजात रुजवयाचे असतील तर अगोदर ते आपल्यात जागवायला लागतील. त्यासाठी त्यांच्या सारखा वैचारिक व सामाजिक दृष्टिकोन आपल्या स्वतःमध्ये विकसित करावा लागेल. त्यासाठी फार मनाची तयारी करावी लागेल, तरच आपण परिवर्तन घडवू शकतो.

0 comments :
Post a Comment