गाडगे बाबांनी त्यांच्या हयातीत संपूर्ण महाराष्ट्र आपल्या विचारांनी जागृत करण्याचे काम केले. या कार्याला अधिक गतिमान करण्यासाठी 'श्री गाडगे महाराज मिशन'ची स्थापना केली. त्यांच्या कार्याच्या व वास्तव्याच्या अनेक आठवणी आहेत. आज आपण त्यांच्या जीवनातील शेवटच्या आठवणीविषयी जाणून घेऊ.
अमरावतीवरून चांदुरबाजारला जाताना वलगावच्या पेढी नदीवर एक पूल आहे, त्या पुलावरील 'गाडगेबाबा सेतू' ही अक्षरं आपलं लक्ष्य वेधून घेतात. अर्थात महाराष्ट्रात त्यापेक्षाही मोठ मोठे पूल आहेत, परंतु ह्या पुलाजवळ आल्यावर आपली पावलं क्षणभर मंदावतात व नजरेत गाडगे बाबांच्या आठवणी जागृत होतात. त्याचे कारण म्हणजे गाडगे बाबांच्या अंतिम श्वासाची हा पूल साक्षीदार आहे.
या पुलावर आल्यावर गाडगे बाबांचा जीवनपट, त्यांनी केलेला त्याग, त्यांचे प्रबोधन आणि स्वच्छता या सर्व बाबी क्षणात डोळ्यासमोर उभ्या राहतात.
गाडगे बाबांच्या जीवनातला अखेरचा अध्याय या पेढी नदीशी आणि पुलाशी आपले ऋणानुबंध टिकवून आहे. चांदुरबाजारहुन गाडी अमरावतीकडे येत असताना 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' भजन करत गाडगे बाबांनी या पुलावर देह ठेवला. यावेळी बाबांसोबत गुणवंतराव शिंदे, अच्युतराव देशमुख, सावित्रीबाई बोराडे, शंकरराव मानेर, दामुसेठ अरबुज इत्यादी मंडळी होती.
सन 1883 साली इंग्रजांनी बांधलेल्या या पुलावर गाडगे बाबांनी आपला अखेरचा श्वास घेतल्याने सन 2002 मध्ये या पुलाचे नामकरण 'संत गाडगे बाबा सेतू' असे करण्यात आले.
संत गाडगे बाबांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक माणसाची पावलं या पुलावर आल्यावर क्षणभर थबकतात.
गाडगे बाबांच्या विचारांचा खजिना ही आपली शिदोरी आहे आणि तिचा प्रचार प्रसार करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यानुसार बाबांच्या आठवणीतील अशी ठिकाणं व त्यांच्याशी निगडित माहिती प्रकाशित होणे काळाची गरज आहे.
- माहिती सौजन्य : मीडिया वॉच

0 comments :
Post a Comment