‘ज्ञानियांना विज्ञान शिकवणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा’



गाडगेबाबा स्वतः अडाणी असले तरी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण म्हणजे लिहता वाचता येणे नाही तर खरे आणि खोटे यातील फरक समजून खोट्याला झुगारून खर्‍याचा स्विकार करणे म्हणजे शिक्षण होय. गाडगेबाबा यांच्या नजरेतून पाहिले तर एकही माणूस अजूनही शिक्षीत झाला नाही.
गाडगेबाबा नाव नाही तर विद्यापीठ आहे. या एका माणसाच्या विद्यापिठामध्ये कर्मकांड, अंधविश्‍वास, व्यसन कोणत्याच गोष्टीला थारा नसून फक्त विज्ञानवाद व तर्कवादाची शिकवण देणारे संत म्हणजे गाडगेबाबा होत.
धर्माच्या व देवाच्या नावावर पोट भरणार्‍या व्यवस्थेला सुरुंग लावणारे व दगडामध्ये देव नाही हे आपल्या पहाडी आवाजातून किर्तनाच्या माध्यमातून गावोगावी फिरून कुणाचा एकही रूपया न घेता प्रबोधनाचे अविरतपणे काम करणारे गाडगेबाबा विचाराशी व ध्येयाशी एकनिष्ठ होते म्हणूनच या व्यवस्थेने गाडगेबाबा यांना दाबण्याचा प्रयत्न केला.
परंतु सूर्य हाताने झाकत नसतो. जो सूर्य हाताना झाकण्याचा प्रयत्न करतो फक्त त्यालाच सूर्य दिसत नाही बाकी कुठेच त्यांचा परिणाम दिसत नाही असेच गाडगेबाबांबद्दल घडले व या बुवाबाजीच्या काळात अनेक बाबा जेलमध्ये असतानाही आम्हांला गाडगेबाबा वंदनीय आहेत. गाडगेबाबांचे विचार ऐकले तर आज स्वतः ला उच्च शिक्षीत समजणार्‍या लोकांच्या डोक्यात मुंग्या आणणारे आहेत. गाडगेबाबा यांचे विचार एवढे धारदार आहेत की ते व्यवस्थेची सरळ चिरफाड करून विज्ञान व तर्कवादाची शिकवण देऊन समाजामध्ये समता निर्माण करतात.
अशिक्षित गाडगेबाबा यांच्या विचाराची भिती येथील ब्राम्हणवाद्यांनी घेतलेली आहे की या माणसाचे विचार कोणत्याच प्रसार माध्यमाच्या माध्यमातून व्यवस्था दाखवू शकत नाही. कारण त्यांना माहिती आहे गाडगेबाबा यांच्या विचारांना आपण थोडी जरी प्रसिध्दी दिली तर पुजार्‍याचे पोट उपाशी मरणार. म्हणून या पुजार्‍याच्या व्यवस्थेने गाडगेबाबाला थोडे दूरच ठेवले आहे.
गाडगेबाबांची कणखर वाणी आणि त्यातही धारदार शब्दाने हजारो वर्षापासून चालत आलेल्या रुढी परंपरा यावर फक्त प्रबोधनच नाही तर स्वतः झुगारून जनजागृती करणारा हा महान संत. आज गाडगे महाराज यांचे विचार सुशिक्षित व्यक्ती वाचू शकत नाही. गाडगे महाराजांचे विचार व्यवस्था चिरणारे असले तरी मानसिक गुलामांना ते जास्त त्रास देतात.
मानसिक गुलाम लोकांना गाडगेबाबा धर्माचे विरोधक वाटतात. आजचा शिकलेला वर्ग गाडगेबाबांच्या विचाराने चालायला घाबरतो. त्याची हिंमतच होत नाही एवढे भेकड व भित्रे लोक या व्यवस्थेने निर्माण केलेले आहेत. विज्ञानाला समोर ठेवून तर्काच्या आधारावर लोकांना सांगून लोकांचे डोके साफ करताना गाडगे बाबा म्हणायचे....
गोपाला गोपाला
देवकी नंदन गोपाला
सांभाळ तुझ्या लेकराला
पुण्य समजती पापाला
ही धोंड्याला म्हणती देवता
भगत धुंडती तया जोगता
स्वतःच देती त्यास योग्यता
देव म्हणून कोणी न भजावे
फुका शेंदरी दगडाला
वरील विचार लोक ऐकू पण शकत नाहीत परंतु गाडगे महाराजांनी महाराष्ट्रभर या विषयावर प्रबोधन केले. दगडाला माहिती नसते आपण कोण आहोत आपणच दगडाचे महत्त्व ठरवतो. जागृत देवस्थान, नवसाला पावणारे देवस्थान, मुल होणारे देवस्थान, देव व दगडाचा जेव्हा विषय येतो तेव्हा भावनिक होऊन धर्माच्या ढालीचा वापर करतात.
कोणता धर्म अज्ञानी राहायचे सागंतो? आणि जो अज्ञानी राहण्यासाठी सांगतात तेथे अज्ञानी राहणाराचा नाही अज्ञानी ठेवणार्‍याचा धर्म असतो. ही साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. देवाच्या नावाखाली लोक अकार्यक्षम बनत आहेत.
आज गाडगेबाबा पुण्यतिथी दिनी मी धाडस करुन व्यवस्थेला एक प्रश्न करणार आहे. हजारो वर्षापासून देवाच्या व कर्मकांडाच्या नावाखाली आमचा पैसा लाटला व लाटत आहात. तुम्ही जर देवाचे मध्यस्थी आहात तर मला कोणत्याही जागृत देवाचे ठिकाण सांगा तेथे जाऊन तुमच्याच परंपरेप्रमाणे मी पूर्ण विधी करतो आणी माझ्यासाठी नाही देशासाठी मागतो. दहशतवादी हल्ले होतात तर आमच्या सैनिकांना मरू देऊ नको. देशात शेतकर्‍यांना फाशी घेऊ देवू नको आणि बलात्कार करणार्‍या लोकांना नपुंसकत्व येऊ दे. हे काम देशासाठी करतोय कोणत्याही साधूने मला यासाठी मदत करावी.
चुकीचे काम करून गोरगरीब जनतेला लुटून स्वतःच स्वतःची पाठ थोपटणारे, मी केलेले काम हेच योग्य आहे म्हणून मिरवणारे लोक कमी नाहीत. गाडगेबाबा यांची एक एक ओवी मानसिक गुलामांच्या व धर्माच्या ठेकेदाराच्या काळजात घुसते आणि हे खोटे असेल तर लाख रूपये पगार घेणारा व स्वतः जवळ बंदूक बाळगणार्‍या लोकांनी बोलून दाखवावे.
धोंड्याला म्हणती देवता. दगडाला लोक देव समजतात आणि त्याची पूजा अर्चा करतात. पूजा अर्चा फुकट होत नाही. दान द्यावे लागते दगडाला बोलता येत नाही, स्वतः चे रक्षण करता येत नाही, अंघोळ करता येत नाही, धोतर नेसता येत नाही, स्वतः च्या घरात दिवा लावता येत नाही तो देव लोकांच्या घरात काय दिवा लावणार हे शब्द सगळे अडाणी असलेले परंतु विद्वान असलेल्या गाडगेबाबांचे आहेत.
गाडगेबाबा यांचे शब्द कानाला व मनाला झोंबणारे असले तरी परिवर्तन करणारे आहेत. मात्र हे शब्द लोकांपर्यंत पोहचू नयेत याची पूर्ण व्यवस्था या व्यवस्थेने केली आहे. गाडगेबाबा आपल्या किर्तनातून सांगतात देव घर देत नाही, देव भाकर देत नाही, देव काहीच देत नाही तरी आम्ही देवाची पूजा करून पुजार्‍याला दान देतो. परंतु घर बांधणार्‍या गवंड्याचा आम्ही सत्कार करत नाहीत.
भटजीच्या हाताने सत्यनारायण करतो. हे विचार गाडगे महाराजांचे आज किती लोक स्विकारतात, किती लोक गाडगेबाबा यांनी दिलेल्या मार्गावर चालण्याचे धाडस करतात. गाडगे महाराजांच्या विचारावर चालायला शिक्षण नाही तर मानसिक धाडस महत्त्वाचे आहे.
आज किती लोक आहेत की नवीन घर घेतले तर त्या घरात कोणतीच पूजाअर्चा न करता राहायला जाता किंवा घर बांधणार्‍या मजुराचा सत्कार करतात. तर एकही नाही. लोक म्हणत असतील आम्ही भटजीला न बोलावता आम्हीच सगळा कार्यक्रम केला तर हे परिवर्तन नाही. उलट भटजी उपस्थित नसतानाही त्याची व्यवस्था टिकण्याचे आपण प्रयत्न करत असतो. लिंबू मिरची खातात की लटकवतात याची अक्कल नसलेले लोक शिक्षीत आहे असे म्हणताच येणार नाही.
कुणी रहावे खुळे अडाणी
शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी
याच साठी झिजते ही वाणी
गाडगेबाबा स्वतः अडाणी असले तरी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण म्हणजे लिहता वाचता येणे नाही तर खरे आणि खोटे यातील फरक समजून खोट्याला झुगारून खर्‍याचा स्विकार करणे म्हणजे शिक्षण होय. गाडगेबाबा यांच्या नजरेतून पाहिले तर एकही माणूस अजूनही शिक्षीत झाला नाही.
खरे आणि खोटे यातील फरक अजूनही कळालेला नाही. म्हणूनच बहुजन समाजाच्या बाया भोगून जेलमध्ये गेलेल्या आसारामचे फोटो आजही लोकांच्या घरात आहेत. परंतु आसाराम सारखे लोक तयारच होऊ नये याची व्यवस्था निर्माण करणारे गाडगेबाबांचे फोटो घरात लावणे आजही या शिकलेल्या लोकांना जमले नाही. दारू पिऊन कुटुबांची राखरांगोळी करू नका असा संदेश देऊनही आज जेवढा जास्त पगार तेवढा महागडा ब्रँड लोक पितात व सगळी कमाई त्यात घालतात.
जे लोक कोणतेच काम करत नाहीत ते लोक तुपाचा शिरा खातात आणि आम्ही काम करू करू आमच्या पिढ्या बरबाद झाल्या तरी आज तूप मिळत नाही ही व्यवस्था निर्माण झाली आहे. म्हणून आपण खरे काय समजून घेतले पाहिजे. म्हैस विकत घेऊन, तिला चारायला नेणे, आणणे, तिची साफसफाई करून दूध काढणारे हे बहुजन आहेत. दुग्धजन्य पदार्थ खाणारे मात्र लोक वेगळे आहेत.
म्हणून जागृती करून आपला शत्रू कोण याची ओळख होणे महत्त्वाचे आहे. पण आज आम्हाला शत्रू आणि मित्र याची ओळख नाही. गाडगे बाबा यांनी समस्त आयुष्य हे समाजाच्या परिवर्तनासाठी खर्ची घातले, परंतु आजही समाजात परिवर्तन झाले नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे. परिवर्तन होते जर आपण गाडगेबाबा यांचे विचार वाचले व स्विकारले तर पण गाडगेबाबांचे विचार वाचायला खूप मोठे काळीज पाहिजे.
मानसिक गुलाम लोकांकडे काळीज नसते म्हणून आज ते देवाची पूजा भक्तीने तर भितीने करत आहेत जर मी असे केले नाही तर कोप होईल प्रकोप होईल वैगेरे वैगेरे. अंधविश्‍वास, कर्मकांड, सत्यनारायण या माध्यातून आपण आपले नाही तर पुजार्‍याचे भले करत असतो. देव देवळात नाही देवळात पुजार्‍याचे पोट असते असे गाडगेबाबा सांगून गेले तरी आजपर्यंत ना विचार आचार ना तर्क केला. परंतु हे सगळे अगोदरच गाडगेबाबा यांनी आपल्या आयुष्यभर सांगतच गेले. आज गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त विज्ञानवादी बनण्याचा प्रयत्न करू या.
विनोद पंजाबराव सदावर्ते
९१३०९७९३००

0 comments :

Post a Comment

 

Wikipedia

Search results

My Blog List

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Our Mission

गाडगे बाबांचे विज्ञानवादी व शैक्षणिक विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे हे आपले उद्दिष्ट आहे. गाडगे बाबा हे परिवर्तनवादी संत होते आणि त्यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे.

Popular Posts


गाडगे बाबा

गाडगे बाबा म्हणजे अन्याय, अत्याचाराने गांजलेल्या व अंधश्रद्धेत बुडालेल्या शोषित पिडीत समाजाला लोकशिक्षण देणारा लोकशिक्षक होय.

Followers

Contact Form

Name

Email *

Message *

Total Pageviews

Blog Archive

Pages

Featured post

संत गाडगेबाबा: द्रष्टा वास्तुनिर्मितीकार

  संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या काळात समाजप्रबोधनाबरोबरच राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया,...

Translate

Books

  • आदिवासी मुलांचे शिक्षण
  • श्री संत गाडगे महाराज - प्रबोधनकार ठाकरे
  • श्री संत गाडगे महाराज
  • लोकशिक्षक गाडगे बाबा

Pages

Followers

External Links