गाडगे बाबांनी आपल्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. रूढी व परंपरा न पाळणे म्हणजे मोठे सामाजिक पातक समजले जात असे. त्यामुळे लोकं प्रसंगी कर्ज काढत, जमिन गहाण ठेवत पण दारू व मटणाचे जेवण खाऊ घातल्याशिवाय राहत नसत. गाडगे बाबांना मात्र या प्रथा व रूढी मान्य नव्हत्या. त्यानुसार त्यांनी या परंपरेला छेद देत परिवर्तनवादी पाऊल टाकत गोडाधोडाचे जेवण केले. प्रसंगी परिणामांचा विचार न करता जे चुकीचे आहे, ते निव्वळ प्रथा किंवा परंपरेसाठी करायचे नाही असा विचार गाडगे बाबांनी आयुष्यभर जपला.
गाडगे बाबांच्या या कृतीतून आपणास फार महत्त्वाची शिकवण मिळते. लोकांना सामाजिक विचारांचे बाळकडू सांगत असताना त्यातील मूल्ये आपण प्रत्यक्षात जगली-जपली पाहिजेत. तरच परिवर्तन होते.
आज समाजात आपणास अनेक प्रबोधनकार किंवा व्याख्याते दिसून येतात. परंतु त्यांच्यात गाडगे बाबांसारख्या द्रष्टेपणाची उणीव जाणवते.
गाडगे बाबा विचारांचा हा महामेरू समाजात अधिक दृढ करायचा असेल तर आपण बाबांचे विचार आपल्या अंतरंगात अगोदर रुजवणे आवश्यक आहे. तरच त्याचे प्रतिबिंब समाजात उमटेल.

0 comments :
Post a Comment