फोकस...!


मागच्या युगापासून आजच्या युगापर्यंत अंधारलेल्या रस्त्यावरून गाडगे बाबांच्या कार्याचा वारसा सुरूच आहे लोकांची मने साफ करण्यासाठी... आज बाबा हयात नसले तरी त्यांच्या कार्याची व विचारांची शिदोरी मजबूत पूल बनून मागच्या आणि आजच्या पिढीला सक्षमपणे जोडत आहे. त्यांच्या हातातला खराटा आजही आपणास समाजातील स्वच्छतेबरोबर मनातील स्वच्छतेचा संदेश देत आहे.
गाडगे बाबांनी रचलेल्या सेतू मार्गाने ज्याला जायचं आहे, त्याने मनाची सफाई करणं तितकंच आवश्यक आहे. जो पर्यंत मनातील जुन्या प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा यांची सफाई आपण करणार नाही, तोपर्यंत गाडगे बाबांचा वारसा पेलण्याचं नैतिक सामर्थ्य आपल्याला मिळणार नाही. म्हणून सर्वांनीच एक माणूस म्हणून जाती-पातीच्या पलीकडे जाऊन या राष्ट्र निर्माणाच्या मानवी कल्याणाच्या कार्यात गाडगे बाबांच्या मूल्यांचा अंगीकार करणे आवश्यक आहे.
रशिया युक्रेनच्या युद्धाने आपणास संपत्ती किंवा पैशाची श्रीमंती यांची मर्यादा अधोरेखित करून दिलेली आहे. भविष्यात असले प्रसंग जगात इतरत्र घडणारच नाहीत हे माणूस म्हणून आपण कोणीच नाकारू शकणार नाही. म्हणून जर आपण गाडगे बाबांची मानवी मूल्ये आपल्या समाजात सक्षमपणे रुजवू शकलो, तर समाजाचे कल्याण तर होईलच, परंतु आपल्याही जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही.
गाडगे बाबांच्या हयातीत आजच्या सारख्या कोणत्याच सोयी-सुविधा उपलब्ध नव्हत्या. असे असतानाही ते महाराष्ट्रभर हातावर भाकरी खाऊन मानवी मूल्यांची जपणूक करत समाजाचे प्रबोधन करत फिरत होते. आज आपल्याकडे सर्वकाही असताना आपण आपल्याच विश्वात ( डबक्यात) अडकलो आहोत. यातून बाहेर पडून सामाजिक उत्थानासाठी गाडगे बाबांचे विचार समाजात पेरण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे.
'भूकेलेल्याला भाकर' हा गाडगे बाबांचा सहज सोपा संदेश स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आपणास समाजात द्यावा लागतोय हे आपल्या व्यवस्थेचं दुर्दैव आहे. परंतु असे असले तरी ही उणीव भरून काढण्यासाठी आपल्यालाच काम करावे लागणार आहे.
'बायकोले कमी भावाचं लुगडं घ्या पण पोराले साळत घाला' असे म्हणणारे गाडगे बाबा कुठे आणि आज बायकोचे दागिने विकून पोराची शाळेची फी भरावी लागणारी शिक्षण व्यवस्था कुठे अशी दयनीय अवस्था आहे. या परिस्थितीत गाडगे बाबांच्या विचाराने प्रेरित होऊन आपणास मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कास धरणे आवश्यक आहे. पटसंख्येअभावी बंद कराव्या लागणाऱ्या शाळांसाठी ठोस कृती कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे.
गाडगे बाबांच्या विचारांचा जागर फक्त टाळ वाजवून किंवा त्यांच्या फोटोला हार घालून होणार नाही. कोरोनासारख्या महामारीत जी सामाजिक दरी निर्माण झाली, ती दूर करण्यासाठी वैचारिक पातळीवर सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आखण्याची गरज आहे. गरिबाला दिवाळी फराळ किंवा चादर देऊन फोटोसेशन करण्यापेक्षा गरिबांची गरिबी हटविण्यासाठी काही लघु उद्योग निर्माण करून त्यांच्या हाताला काम देता येईल का याचाही विचार होणे आवश्यक आहे. गाडगे बाबांनी सामाजिक समस्येचा वापर समाज कार्यासाठी केला नाही. त्यांनी प्रत्यक्ष समस्या निर्मूलनावर काम केले. समाजातील वाईट प्रथांवर प्रहार केले. त्यांच्यात ती प्रहार करण्याची ताकद होती, कारण त्यांच्या विचारांत तितका प्रामाणिकपणा होता. हा प्रामाणिकपणा आपल्यात विकसित करता आला तर सामाजिक पातळीवर आपणही लहान मोठी जबाबदारी पेलू शकू. अर्थात या गोष्टी अवघड असल्या, तरी गरजेच्या आहेत. मनात आणलं तर सहज शक्य आहे. आपली जबाबदारी आणि गाडगे बाबांचे विचार यावर फोकस करता आला, तर अनेक समाज सेवेचे मार्ग आपल्याला खुले होतात. तो फोकस आपण केला पाहिजे.

0 comments :

Post a Comment

 

Wikipedia

Search results

My Blog List

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Our Mission

गाडगे बाबांचे विज्ञानवादी व शैक्षणिक विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे हे आपले उद्दिष्ट आहे. गाडगे बाबा हे परिवर्तनवादी संत होते आणि त्यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे.

Popular Posts


गाडगे बाबा

गाडगे बाबा म्हणजे अन्याय, अत्याचाराने गांजलेल्या व अंधश्रद्धेत बुडालेल्या शोषित पिडीत समाजाला लोकशिक्षण देणारा लोकशिक्षक होय.

Followers

Contact Form

Name

Email *

Message *

Total Pageviews

Blog Archive

Pages

Featured post

संत गाडगेबाबा: द्रष्टा वास्तुनिर्मितीकार

  संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या काळात समाजप्रबोधनाबरोबरच राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया,...

Translate

Books

  • आदिवासी मुलांचे शिक्षण
  • श्री संत गाडगे महाराज - प्रबोधनकार ठाकरे
  • श्री संत गाडगे महाराज
  • लोकशिक्षक गाडगे बाबा

Pages

Followers

External Links