गाडगे बाबांचं जीवन हे एखाद्या धर्मग्रंथापेक्षा वेगळे नाही.
गाडगे बाबांनी व्यसनाधीनता, कर्जबाजारीपणा, गरिबीमुळे समाजातील फक्त दुःख बघितली नाहीत तर स्वतः त्यांचा अनुभव घेतला. त्यामुळे पैसा, संपत्ती, घर, जमिन यांविषयीची आसक्ती त्यांच्या मनातून निघून गेली. त्यांना त्यांच्या आयुष्यात समाजसेवेतून समाधान मिळालं. त्यामुळे जेव्हा त्यांच्याकडे लोकसहभागातून संपत्ती जमा होऊ लागली, तेव्हा त्यांना तिचं प्रदर्शन मांडणं किंवा त्यावर स्वतःची मालकी दाखविण्याची गरज वाटली नाही. त्यांनी चालविलेल्या अन्नछत्रात त्यांनी कधी भाकरीचा तुकडा घेतला नाही. अन्नछत्रात येणाऱ्या लोकांकडे असलेली शिळीपाकी भाकर खाण्यात त्यांनी धन्यता मानली. मुळात त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण समजून घेत नसल्याने आपल्या जीवनात खूप काही असतानाही दुःख आ वासून उभे राहते. जीवनाकडे मृत्यूच्या नजरेतून बघितलं पाहिजे हे त्यांच्या एकंदरीत जीवन प्रवासातून आपण समजून घेण्याची गरज आहे. गौतम बुद्धांनी सांगितलं आहे की जग आणि जीव नश्वर आहेत. मग जे नश्वर आहे त्याचा मोह कशासाठी...! गौतम बुद्धांचा हा विचार प्रत्यक्षात कृतीत आणण्याचे काम बाबांनी केले. गाडगे बाबांचं जीवन हे एखाद्या धर्मग्रंथापेक्षा वेगळे नाही. फक्त त्याचं वाचन करण्याचा डोळसपणा आपण विकसित करण्याची गरज आहे.

0 comments :
Post a Comment