गाडगे महाराज म्हणजे प्रबोधनाचे चालते बोलते विद्यापीठ होते.
प्रबोधन म्हणजे भूतकाळात जे घडून गेले आहे, वर्तमानकाळात जे घडत आहे आणि भविष्यकाळात जे घडणार आहे याची स्थूलमानाने समाजात विचारांची बैठक निर्माण करणे होय. या विचाराने गाडगे बाबांनी समाजात कार्य केले. प्रबोधन म्हणजे केवळ परंपरेचे पुनरुज्जीवन नाही. म्हणूनच केवळ भूतकाळात रमणे वा भूतकाळाला चिटकून बसणे म्हणजे प्रबोधन नाही. तसेच ती परंपरा पूर्णपणे नाकारून केली जाणारी क्रांती म्हणजे देखील प्रबोधन नाही. पुनरुज्जीवनाची दृष्टी मुख्यतः भूतकाळाकडे वळलेली असते. तर क्रांतीची दृष्टी भविष्यकाळाकडे वळलेली असते. प्रबोधनात परंपरेचा गोठलेला प्रवाह गतिमान करायचा असतो. परंपरेला काळाबरोबर पुढे न्यायचे असते. हे कार्य गाडगे बाबांनी यशस्वीपणे केले. त्यांच्या प्रबोधनामुळे समाजातील काही रूढी, प्रथा, विचार लोकांना सोडायला लावले. तर काही विचार, मूल्ये त्यांनी स्वीकारायला लावली. गाडगे बाबांचे प्रबोधन क्रांतिकारी तर होतेच त्याबरोबर ते समाजहिताचे असल्याने लोकांनी ते स्वीकारले. त्यांच्या प्रबोधनाने समाजात परिवर्तन घडले. या परिवर्तनाचे बरेचसे स्वरूप प्रगती, विकास, संपन्नता मिळणे अशा स्वरूपाचे होते. त्यांच्या प्रबोधनात कोणतीही व्यावसायिकता नव्हती. त्यांच्या प्रबोधनातून दृष्टिकोन होता. हाच दृष्टिकोन आजच्या समाजाला गरजेचा आहे.
Debu-The Inspiration
THOUGHTS OF GADGE MAHARAJ

0 comments :
Post a Comment